चंद्रपूर Teli Community Demands : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेस कडून अद्याप कोणातीही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही; मात्र ही उमेदवारी तेली समाजाच्या प्रतिनिधीला देण्यात यावी असा ठराव तेली समाजाच्यावतीनं मांडण्यात आला आहे. आज (17 मार्च) आयोजित तेली समाजाच्या चिंतन बैठकीत याबाबत अपेक्षा जाहीर करण्यात आली आहे.
तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नसल्याचा आरोप : तेली समाजाच्या शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, पूर्व विदर्भात तेली समाजाची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. मात्र त्या तुलनेमध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रामदास तडस यांना उमेदवारी दिली. भाजपाने आपली जबाबदारी पूर्ण केली. आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तेली समाजाच्या उमेदवाराला तिकीट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अशोक चव्हाणांनी माझा विरोध केला- विनायक बांगडे : मला काँग्रेस पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आली होती. मात्र माझी तिकीट कापण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी तगादा लावला. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माझा विरोध केला. त्यामुळे मला तिकीट मिळू शकली नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि 2019 मध्ये ज्यांना सर्वांत आधी काँग्रेसची तिकीट जाहीर झाली होती असे विनायक बांगडे यांनी केला.
उमेदवारी न मिळाल्यास पुढील भूमिका घेऊ : याबाबतची मागणी समाजाच्यावतीनं काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. तेली समाजाला उमेदवारी न जाहीर झाल्यास समाजाकडून पुढील भूमिका घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाच्यावतीनं देण्यात आली.
'या' आधारावर निवडणुकीच्या तिकीटाचे वितरण: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या समाजातील उमेदवाराला राजकीय पक्षाने तिकीट दिले पाहिजे, अशी प्रत्येक समाजाची इच्छा आहे. त्यासाठी बैठका, हितचिंतन केले जात आहे. एखाद्या लोकसभा मतदारसंघात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे हे पाहून निवडणुकीचे तिकीट दिले जाते. त्यामुळे तिकीट न मिळालेल्या उमेदवाराला किंवा त्याच्या जातीच्या मंडळींना त्यांच्या समाजावर अन्याय झाला अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते.
हेही वाचा :