ठाणे : शहरातील एका खासगी शाळेतील शिक्षकानं शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. जेम्स जोसेफ शेराव असं अटक शिक्षकाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक शोषणाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार पीडित मुलांचं लैंगिक शोषण केलं होतं. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकावर विविध कलमांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांकडून करून घेतली तेल मालिश : "अंबरनाथ पश्चिम भागात केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एका सामाजिक संस्थेमार्फत शाळा सुरू आहे. या शाळेत सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातच गेल्या काही महिन्यापासून शिक्षक शाळेतील ७ ते १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून शाळेतील वर्गामध्ये अंगावरील कपडे काढून तेल मालिश करू घेत त्यांचं लैंगिक शोषण करत होता," अशी माहिती बालाजी पांढरे यांनी दिली.
शिक्षकाला पोलीस कोठडी : शिक्षकाकडून वारंवार लैंगिक छळ होत असल्यामुळं पीडित मुलांनी शाळेत जाणं बंद केलं होतं. मुलं शाळेत का येत नाही म्हणून शाळा संचालकानं त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच शिक्षक उघड्या अंगावर पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या तपासात समोर आला. दरम्यान, पीडित मुलांच्या पालकांनी ६ डिसेंबरला अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जात मुलांवर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शिक्षकाला काही तासातच अटक केली. शिक्षकाला न्यायालयात हजर केलं असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
हेही वाचा -