पुणे Supriya Sule On Pm Modi : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोरदार टीका केली. "निवडणुका आल्या असून आता आणखी किती जुमले पाहायला मिळणार आहेत, हे पाहूया. अभी पिक्चर बाकी आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत काय काय जाहीर करतील, देवास ठाऊक. इतके दिवस जेव्हा सिलेंडर 1 हजार रुपये होता आणि महिला रडत होत्या, तेव्हा यांना सुचलं नाही," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
मी कुठल्याही मंदिरात साकड घालायला जात नाही : महाशिवरात्री निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज धारेश्वर मंदिरात भेट दिली. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कुठल्याही मंदिरात साकडं घालायला कधी जात नाही. मी फक्त भक्तिभावानं आशीर्वाद घ्यायला येत असते. महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देते. तसंच आज जागतिक महिला दिन असून जर 365 दिवस माणुसकी वापरली, तर समतेबद्दल जे आपण लढत आहोत, त्याला आणखी एक दिशा मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. त्या पुढं म्हणाल्या की, शंभर रुपयांनी काहीही दिलासा मिळणार नाही. तेल तसंच साखर, भाज्या, औषधं, शिक्षण काहीच स्वस्त नसून सगळचं महाग आहे. या देशात काय स्वस्त आहे, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.
महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यात पडणार नाही : महायुतीच्या जागा वाटपाचा अजूनही तिढा सुटलेला नाही. यासाठी अमित शाह यांना मुंबईत यावं लागत आहे, का असं सुप्रिया सुळे यांना विचारलं होतं. यावर त्या म्हणाल्या की, ती त्यांची युती असून त्यांच्या युतीत आपण कशाला पडायचं. महाविकास आघाडी तसंच इंडिया आघाडी म्हणून आम्ही राज्यात 48 जागा लढवणार आहोत. आमचं उद्दिष्ट आहे की महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, यासाठी आम्ही लढत आहोत," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं असतं तर.. : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर टीका केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "स्तर हे समाज ठरवत असतो, एक माणूस नाही ठरवत. समाजात आपलं स्थान काय आहे, हे जनता ठरवत असते. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जर चांगलं काम केलं असतं, तर शरद पवार यांना हे व्यक्त करायची वेळच आली नसती. हर्षवर्धन पाटील भाजपाचे नेते असून सत्तेत असताना त्यांना जर धमक्या येत असतील, तर गृहमंत्री यांचं फेल्युअर आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनील शेळके यांच्याबाबत जर तुम्हाला वाटत असेल की, शरद पवार खोटं बोलत आहेत, तर तुम्ही राज्यभर दौरा करा आणि खरी परिस्थिती समोर आणा, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा :