पुणे Supriya Sule On Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या निमित्तानं मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. "दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ते दिल्लीला भाजपाच्या मोठ्या नेत्यांना भेटले. त्यावेळेस त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती. त्यांची मतं कोणाच्या पारड्यात पडतील, हे काळच ठरवेल. मी त्यांचं भाषण काल ऐकलं नाही, प्रचारात होते," असं यावेळी सुप्रिया सुळे पुण्यात बोलताना सांगितलं.
पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या भाषणावर कारवाई करावी : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. याबाबत सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान मोदीजी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केलं आहे. त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी कारवाई करावी. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गेल्या वेळेस पंतप्रधान मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं, हे थांबलं पाहिजे. त्याचा मी निषेध करते, माझी अपेक्षा आहे, पंतप्रधान मोदी यांचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे. अशी भाषा थांबली पाहिजे, अशा व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात दुष्काळी परिस्थिती : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "जवळपास डिसेंबरपासून सातत्यानं दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहे. मजूर अडचणीत आहे, हे सातत्यानं मी बोलत आहे. माझ्या मतदारसंघात उजनीत एक थेंब पाणी नाही, नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35 टक्के पाणी शिल्लक आहे. राज्यात पाणी पुरेल की नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार अतिशय असंवेदनशील आहे. प्रचारात व्यस्त आहे, त्यांना दुष्काळाचं काही घेणंदेणं नाही," अशी टीका यावेळी सुळे यांनी केली.
अजित पवारांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार : अजित पवार यांनी बारामतीत जे भाष्य केलं त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की "लोकशाही आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. कोणते ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांना थांबा म्हणत होते, याची माहिती घ्यायला मला आवडेल. मला वाटतं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही. ज्यांनी ही वक्तव्यं केली त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर विचारा. माझी लढाई बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि गरिबी यासाठी आहे," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे : रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "दुर्दैव आहे, महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे. अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे. त्याचाच हा एक भाग आहे." सांगलीच्या बाबतीत महाविकास आघाडी नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "काळजी नसावी, महाविकास आघाडी आणि सांगलीमधील प्रत्येक नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. काही बातम्या आल्या असतील तर आम्ही जातीनं लक्ष घालून मार्ग काढू," असं यावेळी सुळे म्हणाल्या.
हेही वाचा :
- 'बडे लोग, बडी बाते' मतदारांना हेलिकॉप्टरने आणू म्हणणाऱ्यांची ईडी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे - सुप्रिया सुळे - Supriya Sule on Hasan Mushrif
- वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi
- "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news