नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक विनोद शेलार यांना आमदार सुहास कांदे यांनी चांगलंच खडसावत शिवीगाळ केल्यानं मोठी खळबळ उडाली. यावेळी सुहास कांदे यांनी विनोद शेलार यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला. "इथं माझीच दहशत, अन् ती कायम राहणार," असं म्हणत सुहास कांदे यांनी शिवीगाळ केली. समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल करायला जाताना ही घटना घडली. याबाबत विनोद शेलार यांनी सुहास कांदे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं.
इथं फक्त माझीच दहशत कायम राहणार - सुहास कांदे : महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी विनोद शेलार यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ पुढं आला आहे. विनोद शेलार यांनी केलेल्या भाषणाबाबत सुहास कांदे यांनी विनोद शेलार यांना त्यांना शिवीगाळ केली. "इथं फक्त माझीच दहशत आहे, अन् ती कायम राहणार," असं म्हणत आमदार सुहास कांदे यांनी शिवीगाळ केली. विशेष म्हणजे आमदार सुहास कांदे शिवीगाळ करत असताना काही महिलाही या ठिकाणी असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.
समीर भुजबळांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज : नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेत मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांनी जोरदार भाषण केलं. हे भाषण संपताच सुहास कांदे यांनी पगार यांना फोन करुन शिवीगाळ केली आहे. ही शिवीगाळ पगार यांनी भरसभेत सगळ्यांना ऐकवली. उमेदवार सुहास कांदे यांनी अर्वाच्य भाषेत शेखर पगार यांना केलेली शिवीगाळ भर सभेत सगळ्यांना एकवल्यानं आता नांदगाव मतदारसंघात चर्चा रंगल्या आहेत.
काय म्हणाले समीर भुजबळ : "भयमुक्त नांदगाव असं मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. यासाठीच मला नागरिकांनी बोलावलं आहे. म्हणून मी पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. नेत्यानं केवळ भाषण केले म्हणून त्याला धमक्यांसाठी फोन येतात. मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना विनंती करतो की, आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. या सर्व घटनांची दखल घ्यावी," अशी मागणी समीर भुजबळ यांनी पोलिसांना केली आहे.
हेही वाचा :