मुंबई Monsoon Assembly Session 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधाच्यावेळी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. काही इतिहास संशोधकांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा केला. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन गुरुवारी पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. मात्र सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच असल्याचं मंत्री मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितलं.
वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याबाबत संभ्रम : विधानसभेत गुरुवारी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी वाघनखांवरुन प्रश्न उपस्थित केला. "लंडनवरुन आणण्यात येणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याबाबत बाहेर संभ्रम पसरविणारी चर्चा सुरु आहे. यावर सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी निवेदन करावं," अशी मागणी त्यांनी केली. यावर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या खास शैलीत टीकाकारांना धारेवर धरलं. मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, "लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयात असलेल्या वाघनखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. लंडनवरून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं प्रदर्शन 19 जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत आहे. तिथं जोरदार स्वागत होणार असून कार्यक्रमाचं आमदार आणि शिवप्रेमींना जाहीर निमंत्रण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वाघनखं भारतात आणण्याची शिवभक्तांची मागणी : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत, अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रं अनेक शिवभक्तांनी आमच्याकडं पाठवली. व्हिकटोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडं सदर वाघनखं दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये 1875 आणि 1896 या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखं प्रदर्शित झाली. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणंही काही शिवभक्तांनी पाठवली, यात ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केल्याचं त्या बातम्यात म्हटलं होतं. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखं आहेत, हे खरं असलं तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच 1825 मध्ये विशेष पेटीचं आवरण बनवण्यात आलं आहे. त्यावर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरली वाघनखं : "अनेक शिवभक्तांनी लंडनमधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडनमधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याचं उत्तर देताना संबंधित संग्रहालयानं हे मान्य केलं की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली आहेत," असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, "तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठं इतरत्र अशी वाघनखं आहेत का? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात या संग्रहालयानं कधीही ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं नाकारलं नाही."
साताऱ्यात 19 जुलैपासून वाघनखांचं प्रदर्शन : "लंडनवरुन येणारी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं येत्या 19 जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत. जनतेला त्याचं दर्शन घेता येईल. या सोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रं प्रदर्शित करणाऱ्या एका शस्त्र दालनाचंही उद्घाटन करण्यात येणार आहे," असंही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :