ठाणे : शहरात भटक्या श्वानांनी एक साठ वर्षीय महिलेवर हल्ला करून तिला 100 मीटर पर्यत फरफटत नेत, तिच्या अंगाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार टिटवाळा शहरातील रिजेन्सी सर्वम येथील बिल्डिंग नंबर 8 आणि 9 च्या मागील परिसरात घडला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्यानं तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदरील महिलेची ओळख पटलेली नसून ही महिला भिक्षेकरी किंवा कचरा वेचक असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यत आली आहे.
भटक्या श्वानांचा महिलेवर हल्ला : शुक्रवारी (6 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास सदरील महिला पायी चालली होती. या महिलेला पाहून चार भटके श्वान तिच्या अंगावर धाऊन आले. चारही श्वानांनी एकावेळी या महिलेवर हल्ला केल्यानं ती जमिनीवर कोसळली. भटक्या श्वानांनी महिलेचे कपडे, तिच्या शरीराला चावे घेऊन तिला घायाळ केलं होतं. या महिलेने सुरूवातीला भटक्या श्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु, एकचवेळी चारही श्वान आक्रमकपणे महिलेवर हल्ला करत असल्यानं तिला उठणं शक्य झालं नाही.
नागरिकांनी केली मदत : या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेली महिला घटनास्थळीच बेशुध्द पडली होती. श्वानांनी या महिलेला ओढत गृहसंकुलाच्या दिशेने नेलं होतं. महिलेची श्वानांशी प्रतिकार करण्याची शक्यती संपल्यानं ती निपचित पडून होती. परिसरातील काही रहिवाशांना, गृहसंकुलाच्या रखवालदारांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी धावून आले. त्यावेळी श्वानांनी त्या महिलेला सोडून पळ काढला. जागरूक नागरिकांनी तातडीनं या महिलेला गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिच्यावर उपचार सुरू आहेत.
महिलेची ओळख पटली नाही : माहिलेवर गोवेली रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय, तेथून कळवा येथील शासकीय रूग्णालय येथे पाठविण्यात आले. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर साठ वर्ष वयाच्या या महिलेची ओळख पटलेली नसल्याची माहिती, कल्याण ग्रामीण गोवेली शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, डाॅ. दीपलक्ष्मी कांबळे यांनी दिली.
हेही वाचा -
- खळबळजनक ! भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी चिमुरडीचा मृत्यू - Dog Bite Death In Bhiwandi
- गोरेगाव येथील 'नेस्को एक्झिबिशन सेंटर'मध्ये 26 भटक्या श्वानांचा मृत्यू, पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
- भटका कुत्रा चावल्यास १० हजार रुपयांची भरपाई, मुंबईचे प्राणीमित्र म्हणतात अशाने समस्या सुटणार का?