शिर्डी Old Pension Scheme : 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने'च्या वतीनं रविवारी (15 सप्टेंबर) कोपरगावात राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. 'एकच मिशन जुनी पेन्शन' आणि 'वोट फॉर ओपीएस' असा निर्धार करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यभरातील सरकारी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती, महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली.
विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण : कोपरगाव येथील जनार्धन स्वामी महाराज मंदिराजवळील मैदानावर 15 सप्टेंबर रोजी जुनी पेन्शन संघटनेचं खुलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. अधिवेशनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती, वितेश खांडेकर यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करा : राज्यातील संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू करण्यात यावी, एवढी एक मागणी या अधिवेशनात करण्यात येणार आहे. 2005 नंतरच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अनेक नव-नवीन पेन्शन योजनेची आमिषं दाखवली. मात्र, ही फक्त आमिषच राहिली असल्यानं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने या विरोधात तीव्र असा लढा उभा केलाय. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी शासन दरबारी गेली अनेक वर्ष मागणी लावून धरली आहे. तर शासनाने देखील आता कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या रोशाला शासनाला सामोरे जावं लागेल. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी, वितेश खांडेकर यांनी केली आहे.
अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला : जनार्धन स्वामी महाराज मंदिराजवळील 8 एकर मैदानावर भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. राज्यभरातून साधारण एक ते दीड लाख कर्मचारी उपस्थिती राहणार असल्याची माहिती वितेश खांडेकर यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेचे राज्याचे सचिव गोविंद उगले, कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, सल्लागार सुनील दुधे, कोषाध्यक्ष प्रवीण बडे, मिलिंद सोळंकी, सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ, शैलेश राऊत, रामदास वाघ, प्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे, नाना गाढवे, प्रवीण झावरे, सुमित बच्छाव विनायक चोथे, संजय सोनार, नदीम पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अधिवेशनासाठी परिश्रम घेतले आहे.
हेही वाचा -