मुंबई ST employees called off strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून एसटी कामगार कृती समिती कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात राज्यातील 11 कामगार संघटनेच्या कृती समितीचा सहभाग होता. आज या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाली. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ देण्यावर बैठकीत सहमती झाली.
पगारवाढ ऑक्टोबरमध्ये मिळणार - बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, किरण पावसकर, गोपीचंद पडळकर बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पगारवाढ करण्यात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली ही पगारवाढ ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. तसंच जे अनेक कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरी बसले होते. त्यांनाही हे सरकार कामावर घेणार आहे. या व्यतिरिक्त सरकारने सकारात्मक तोडगा काढून जी पगारवाढ दिली आहे, त्याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, असं बैठकीनंतर किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
तोडगा निघाला - उल्लेखनिय बाब म्हणजे मंगळवारी 251 आगारापैकी 35 आगार बंद होती. या आगारांमध्ये वाहतूक संपूर्णतः ठप्प होती. गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यामुळे गावी जाणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. दुसरीकडे आज सायंकाळी एसटी कर्मचारी संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात एसटी संपावर बैठक झाली. यामध्ये सकारात्मक तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र तोडगा निघाला. आजच्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला होता.
कुणी राजकारण करू नये एसटी कामगार संघटनांनी दिलेलं पत्र आणि मागण्या यामध्ये तफावत होती. त्यामुळं मंगळवारी निर्णय घेता आला नाही. मात्र एसटी कामगार संघटनांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बेठक झाली. या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना त्याबद्दल कुणी राजकारण करू नये, असं सामंतांनी विरोधकांना सुनावलं होतं.
महामंडळाकडून जाहिरात - एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे अस्त्र उगारले असताना, दुसरीकडे एसटी महामंडळाने चालकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. महामंडळ मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून चालक कंत्राटी पद्धतीने घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहिरात दिली. चालकाला किमान 1 वर्षाचा अनुभव असावा, तसंच अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना, पीएसव्ही बॅच असणे आवश्यक होतं. जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून 3 दिवसाच्या आत महामंडळाकडे आपली मागणी नोंदवू शकतील, असं महामंडळानं आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं. यामुळे एकीकडे राज्यातील एसटी कर्मचारी संप करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होतं. आता संप मिटल्यानं अशी काही भरती करण्याचाही प्रश्न मिटला आहे.
2 दिवसात 14-15 कोटी रुपयांचे नुकसान - आज (बुधवारी) राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 59 आगार पुर्णतः बंद होते. 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती. आज 22389 नियोजित फेऱ्या पैकी आंदोलनामुळे 11943 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे 50% वाहतूक बंद होती. या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभर अंदाजे 14-15 कोटी रुपयांचा महसूल बुडालेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून होणारी आजची कोकणातील जादा वाहतूक सुरळीत चालू आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरी सेवा व्यवस्थित चालू आहे.
एसटी कामगारांच्या काय आहेत मागण्या काय?
- शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन मिळावे
- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, मागील वेतन वाढीतील त्रुटी दूर करणे
- महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ देणे
- मेडिकल कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करणे