अकोले Seed Rakhi For Raksha Bandhan : 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी रे माया', या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभी राहाते. अगदी या गीताला शोभेल असंच अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी भेट आपल्या भावाला दिलीय.
गावरान बियांचा वापर करून बनवली 'बीज राखी' : भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, घोसाळी, डांगर, भोपळा यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून राहीबाई पोपेरे यांनी आपल्या स्वतःच्या हातानं राख्या बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या राहीबाईंनी आजपर्यंत बीज बँकेच्या रुपानं महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमानं आणि गावरान बीज संवर्धन आणि पुरवठा करून आदरानं आपला भाऊ बनवून घेतलंय. राहीबाई पोपेरेंच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी राहीबाईंनी या बीज राख्यांची निर्मिती केलीय.
सैनिकांसाठीही पाठवल्या राख्या : आपल्या भावांसाठी राहीबाईंनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढं नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचं सांगितलंय. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी देखील त्यांनी बीज राख्या भेट म्हणून पाठवल्या आहेत. बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिलय.
हेही वाचा -
- रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट: कोणत्या वेळेत बांधावी राखी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त - Raksha Bandhan 2024
- बहिणींनो राखी बांधायला जायचं! मग बघा मुंबई लोकलचं वेळापत्रक, 'या' मार्गावर आहे मेगॉब्लॉक - Mumbai Mega Block
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटोची राखी मिळवा फुकट, फक्त 'ही' आहे अट! - Eknath Shinde Special Rakhi