मुंबई Malegaon Bomb Blast Case : भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागच्या वेळेला न्यायालयानं ताकीद देऊन सुद्धा या वेळेला सुनावणीला मालेगाव बॉम्बस्फोटामधील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या गैरहजर राहिल्या. त्यामुळे दहा हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या न्यायालयानं बजावलं आहे. ही रक्कम भरेपर्यंत कारवाईची टांगती तलवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कायम आहे.
जबाब नोंदणीसाठी सतत गैरहजर : मालेगाव बॉम्बस्फोटामधील मुख्य आरोपी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मागच्या वेळेला न्यायालयानं हजर राहण्याबाबत बजावलेलं होतं. "तुम्हाला नियमित फौजदारी प्रक्रिया संहिता 313 च्या नुसार जबाब नोंदणी करता हजर राहावं लागेल. जर हजर नाही झाले, तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे," असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. "या वेळेला तब्येतीच्या कारणामुळं आरोपी गैरहजर आहे," असं वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं. मात्र न्यायालयाचं त्यावर समाधान झालं नाही. त्यांनी आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना दहा हजार रुपयाचं जामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे.
काय होतं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : नाशिक जवळील मालेगाव या ठिकाणी 29 सप्टेंबर 2018 ला बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या घटनेमध्ये एकूण 13 आरोपी होते. त्यापैकी पाच आरोपींची सुटका झालेली आहे. त्यानंतर या खटल्यामध्ये सात आरोपी आहेत. त्यापैकी दोन आरोपी हे फरार झालेले आहेत. त्या दोनपैकी एकाचं नाव आरोपी रामचंद्र गोपाल सिंग कलसंगरा उर्फ रामजी उर्फ ओमजी उर्फ पटेल आणि दुसरा संदीप डांगे हे दोघं फरार झालेले आहेत. त्यात प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणे, दहशतवादी कारवाया करणे, असे गुन्हे दाखल आहेत. आता आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना 10 हजार रुपये जामीन रक्कम भरल्याशिवाय कारवाई पूर्ण होणार नाही.
हेही वाचा :
- Pragya Thakur Speech: कर्नाटकमध्ये 'द्वेषपूर्ण' भाषण केल्याप्रकरणी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल
- Pragya Singh Thakur: प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Sextortion Case : खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ जिल्हा न्यायालयात जबाब नोंदवला