अमरावती Independence Day Invitation : दारूबंदी ते कृषी क्रांती असा प्रवास करणाऱ्या ममता ठाकूर (Mamta Thakur) यांच्या कर्तृत्वाची दखल थेट केंद्र शासनानं घेतली. आता स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. एका छोट्याशा गावातील महिला स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचा अभिमान संपूर्ण गावानं व्यक्त केलाय. पती प्रमोद ठाकूर यांच्यासह ममता ठाकूर या बुधवारी सकाळी विमानानं दिल्लीकडे रवाना झाल्या. ममता ठाकूर यांच्या या यशस्वी प्रवासासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
विविध पुरस्कारांनी सन्मानित : केवळ चूल आणि मूल या पलीकडं दुसरं काहीही नाही, अशी अनेक वर्ष अवस्था असणाऱ्या ममता ठाकूर यांना घराबाहेर पडण्याची प्रेरणा कुटुंबीयांनी दिली. या प्रेरणेतूनच ममता यांनी गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. घरातील शेतीचा कारभार देखील त्यांनी हाती घेतला. कमी खर्चात त्या शेतात दर्जेदार पीक घेत असून त्यांच्या शेतातील तूरडाळ थेट मुंबईत पोहोचली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना सशक्त बनवण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. राज्य शासनाकडून विविध पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलंय.
स्वातंत्र्य दिन समारंभात विशेष अतिथी म्हणून मान : कृषी क्षेत्रातील योगदान आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी ममता ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नाची दखल, केंद्र शासनाच्या वतीनं घेतली आहे. त्यांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. दिल्लीत थ्री स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. "माझ्यासारख्या साध्या महिलेची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणं ही खरोखरच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे," असं ममता ठाकूर म्हणाल्या.
महिलांना दाखवली प्रगतीची वाट : कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ममता ठाकूर यांना 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा खास लाभ मिळाला. या योजनेमुळं शेतीसाठी खास 'दशपर्णी' तयार करुन त्या शेतात अतिशय उच्च दर्जाची तूर, मिरची, धणे, गहू, ज्वारी अशा पिकांचं उत्पन्न घेतात. यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक औषधाचा वापर केला नाही. तर स्वतः घरी बनवलेलं 'दशपर्णी' अर्क त्यांनी शेतात वापरला. यासोबतच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शिलाई कामाचं प्रशिक्षण दिलं. शेतरुपा बचत गटाच्या माध्यमातून ममता ठाकूर यांनी आपल्यासह गावातील अनेक महिलांना प्रगतीची वाट दाखवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं त्यांना 'हिरकणी' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
कृषी विज्ञान केंद्रानं बदलली दृष्टी : आपल्या घराशिवाय बाहेरचं जग अजिबात ठाऊक नसताना घातखेड इथल्या संत ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रणिता यांच्याकडून 2007-08 पासून गावातील महिलांना कृषी क्षेत्रात योगदान देण्यासंदर्भात प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून गावातील अनेक महिला एकत्र आल्या. महिलांनी घातखेड इथल्या संत ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. ही भेट त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणारी ठरली.
प्रगतीची नवी वाट : "घातखेड इथल्या कृषी विज्ञान केंद्राद्वारे मिळणारं मार्गदर्शन आणि डॉ. प्रणिता यांची साथ लाभल्यामुळं आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. शेतीची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतली. यात पतीची महत्त्वाची साथ होतीच. आज दर्जेदार शेतीबरोबर घरी गाईंचं पालन, शेणखत निर्मिती, शेणापासून गॅस निर्मिती केली जात आहे. यामुळं प्रगतीची नवी वाट मला मिळाली." असं ममता ठाकूर 'ईटीव्ही भारत'ला सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. शेतात मोठ्या प्रमाणात झालेली तूर बाजारात न विकता स्वतः त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी खास यंत्र देखील खरेदी केलं. तुरीवर केलेल्या प्रक्रियेमुळं अतिशय चांगला मोबदला मिळायला लागला. घरात तयार केलेली उत्तम तूर त्या स्वतः घरोघरी जाऊन विकतात.
महालक्ष्मी सरस मेळाव्यात सहभाग : मुंबईत आयोजित केलेल्या 'महालक्ष्मी सरस मेळाव्यात' 2016 मध्ये ममता ठाकूर यांच्या नेतृत्वातील 'शेतरुपा महिला बचत गट' सहभागी झाला. यावेळी या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेली तूरडाळ, तिखट, धणे पावडर आदी कृषी साहित्य विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
महिला बचत गटांनी केली कंपनी स्थापन : ममता ठाकूर यांच्या नेतृत्वात 'शेतरूपा बचत गटा'ची विकासात्मक वाटचाल पाहता कृषी विभागाच्या वतीनं 'चांदुर रेल्वे वुमन्स फार्मर प्रोडूसर कंपनीची' स्थापना 2020 मध्ये करण्यात आली. सर्वानुमते या कंपनीच्या अध्यक्षपदी ममता ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीला तालुक्याचं ठिकाण असणाऱ्या चांदुर रेल्वे इथं कृषी केंद्र मिळालं. "अतिशय नियोजनबद्धरित्या या कृषी केंद्राचं काम सर्व महिलांनी योग्यपणे हाताळलं. यामुळं यावर्षी तब्बल 50 लाख रुपयांची उलाढाल कृषी केंद्रानं केली. गतवर्षी एकूण 33 क्विंटल तूर महिला बचत गटानं खरेदी केली. एका क्विंटल मागे दोन हजाराचा फायदा आम्हाला झाला असून सर्व महिला खूश झाल्या," असं ममता ठाकूर यांनी सांगितलं.
हेही वाचा -