मुंबई Son killed mother : घरातील कामे करताना झोपमोड झाल्याने ६४ वर्षीय मुलाने रागाच्या भरात सुऱ्याने सपासप वार करुन ७८ वर्षीय वयोवृद्ध आईची हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ग्रँट रोड येथे घडली. रमाबाई नथू पिसाळ (वय ७८) असं मृत आईचं नाव असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष पुंजाजी वाघ याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिली आहे.
डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील रमाबाई पिसाळ या त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा सुभाष वाघ याच्यासोबत ग्रँट रोड येथील चुनाम लेन परिसरातील पंडीतालय इमारतीमध्ये राहत होत्या. सुभाष वाघ हा पाणी भरण्यासाठी रोज सकाळी लवकर उठत होता. त्यामुळे तो लवकर झोपत असे. सुभाष हा रात्री झोपत असताना आई रमाबाई ही घरातील कामे करत असायची. त्यामुळे, सुभाषची झोपमोड व्हायची. यावरुन दोघांमध्ये भांडण होत होते.
मंगळवारी सकाळी याच कारणावरून सुभाष आणि रमाबाई यांच्यात वाद झाला. वादानंतर सुभाषने घरातील सुरा उचलून आईवर सपासप वार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर काही वेळाने सुभाषने त्याच्या शेजारी राहत असलेल्या त्याच्या पुतण्याला त्याने आईची हत्या केल्याचं सांगितलं. पुतण्याने डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील रमाबाई यांना उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी रमाबाई यांना दाखलपूर्व मृत घोषित केलं.
डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी रमाबाई यांच्या पुतण्याची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०३ (१) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष याला ताब्यात घेत चौकशीअंती अटक केली. आरोपी सुभाष याने आई रमाबाईच्या हत्येसाठी वापरलेला लोखंडी सुरा हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.