अमरावती : श्रीमंतांच्या घरात रंगकाम करताना आपली मुलं पण श्रीमंतांच्या मुलांसारखी शिकावीत, मोठी व्हावीत, असं स्वप्न वडील अनेक वर्ष घाम गाळत असताना रंगवत होते. दोन वर्षांपूर्वी मुलगी आयआरएस झाली. आता 31 डिसेंबर 2024 रोजी ती दिल्लीत टेलीकम्युनिकेशन विभागात अधिकारी म्हणून रुजू झाली. आई-वडिलांच्या आयुष्यात आनंदाचा रंग तीनं खऱ्या अर्थानं भरला. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबानं पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी मुलींनं मेहनतीनं घेतलेली झेप या संदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
झोपडपट्टी परिसरातील कुटुंबाचं पालटलं आयुष्य : अमरावती शहरातील बिच्छू टेकडी या मागासलेल्या परिसरात नाल्याच्या अगदी काठावर देविदास चिंचखेडे या रंगकाम करणाऱ्या व्यक्तीचं छोटसं घर. शिवणकाम करणारी पत्नी सुनीता, दोन मुली आणि एक मुलगा, असं त्यांचं कुटुंब. आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं, असं स्वप्न देविदास चिंचखेडे यांनी पाहिलं. त्यांचं हेच स्वप्न त्यांची मोठी मुलगी पल्लवी चिंचखेडे हिनं खऱ्या अर्थानं वास्तवात आणलं. खरंतर बिच्छू टेकडी सारख्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातली मुलगी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणं हे अनेकांसाठी अविश्वासनीयच. 2021 मध्ये या परिसरात पल्लवी चिंचखेडे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. 31 डिसेंबरला दिल्लीत संचार भवन या ठिकाणी रुजू झाली. पल्लवीचे कष्ट आणि कुटुंबातील सर्वांनी आयुष्याचं यशस्वी ध्येय निश्चित केल्यावर ते ध्येय गाठण्याची जिद्द आणि ध्येयप्राप्तीनंतर पालटणारं आयुष्य, याचा खरा आनंद आज चिंचखेडे कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. आज या कुटुंबातील पल्लवी ही आयआरएस अधिकारी झाली असताना तिची लहान बहीण मीनल ही युनियन बँकेत अधिकारी झाली.
आनंद विद्यालयात झालं शिक्षण : अमरावती शहरातील बिच्छू टेकडी, राहुल नगर, वडाळी या झोपडपट्टी परिसरात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस नगर परिसरात असणारं आनंद विद्यालय म्हणजे सोयीची आणि परवडणारी शाळा. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पल्लवीचं शिक्षण देखील याच आनंद विद्यालयात झालं. दहावीनंतर विद्याभारती महाविद्यालयात सामान्य विज्ञान शाखेतून पल्लवी बारावी उत्तीर्ण झाली. यानंतर अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल विषयात तिनं बी टेकची पदवी मिळवली.
अधिकारी होण्यासाठी पुण्यात केली नोकरी :"अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं प्रा नरेशचंद्र काठोळे यांच्या संस्थेच्या वतीनं आयएएस तुकाराम मुंडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मी इयत्ता सातवीत शिकत होती. वडिलांनी त्या कार्यक्रमाला मला नेलं. तो सोहळा मी पाहिला त्यावेळी प्रा नरेशचंद्र काठोळे यांनी काही पुस्तक मला बक्षीस म्हणून दिलीत. त्या कार्यक्रमात तुकाराम मुंडे यांचं भाषण ऐकल्यावर आपण देखील असंच अधिकारी व्हावं, असं मनात ठासलं. तेव्हापासून स्पर्धा परीक्षांची माहिती घेण्यास सुरुवात केली. बीटेक झाल्यावर पुण्यात विप्रो कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. खरंतर तीन वर्षांच्या ह्या नोकरीमध्ये मी आयएएस होण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागते, त्या मार्गदर्शनासाठी पैसे जमा केले. माझ्याकडं जमा झालेले पैसे आणि काही मित्रांनी दिलेल्या पैशातून मी एक वर्ष दिल्लीत कोचिंग क्लास लावला. त्यानंतर नागपूर इथं फ्री रेसिडेन्शिअल कोचिंग आणि स्टायपेंड मला मिळाला," असं पल्लवी चिंचखेडे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
- वडील विकतात रद्दी, तीन बाय दहाच्या खोलीत अभ्यास करून झाली सीए; कोण आहे रुचिता?
- आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, पेंटर कामगाराचा मुलगा झाला 'क्लास वन अधिकारी', गावात जंगी स्वागत - MPSC Success Story
- वडील करायचे शिकार अन् आई मागायची भीक; विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन निकितानं मिळवली शासकीय नोकरी - Amravati Success Story