छत्रपती संभाजीनगर : उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय. मध्य विधानसभा मतदारसंघात घोषित केलेले उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना माघार घेतली. मतदारसंघाची परिस्थिती पाहता 2014 मध्ये मतांचं विभाजन झाल्यानं एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. त्यामुळं निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून आम्ही चर्चा करून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करत आहोत. तर किशनचंद तनवाणी यांना कार्यमुक्त करत असल्याची घोषणा उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली.
किशनचंद तनवाणी यांची अचानक माघार : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील लक्षवेधी असा मतदारसंघ मानला जातो. शिवसेनेतील दोन नेते एकमेकांच्या विरोधात लढण्यास सज्ज झाले होते. शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल तर उबाठाकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 2014 मध्ये हे दोघं मित्र परस्पर विरोधात निवडणूक लढले होते. त्यावेळी दोघांच्या भांडणात एमआयएम पक्षानं मुस्लिम मतांच्या जोरावर विजय मिळवला. 2019 मध्ये सेना भाजपा एकत्र लढल्यानं प्रदीप जैस्वाल विजयी झाले. मात्र यावेळी एकाच पक्षात दोन गट झाल्यानं दोन वेगवेगळे उमेदवार उभे केले जात आहेत. यावेळी पुन्हा जैस्वाल विरोधात तनवाणी अशी लढत होत आहे. त्यामुळं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचे काही तास शिल्लक असताना उबाठाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली. मतांचं विभाजन होणार असल्यानं पुन्हा एमआयएम जिंकेल म्हणून माघार घेत असल्याचं किशनचंद तनवाणी यांनी सांगितलं.
ठाकरे गटाने दिला नवीन उमेदवार : किशनचंद तनवाणी यांनी माघार घेताच उबाठा पक्षानं आपला उमेदवार बदलला आहे. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देत असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जाहीर केलं. तर किशनचंद तनवाणी यांनीच उमेदवारी मागितली होती, ते सक्षम असल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाशी किंवा नेत्यांशी कुठलीही चर्चा न करता त्यांनी अचानक हा निर्णय घेणं योग्य नाही. त्यामुळं पक्षाच्या कामातून त्यांना मुक्त करत असल्याची घोषणा अंबादास दानवे यांनी केली. त्यावर मी किंवा माझा कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही. नवीन उमेदवाराला मदत करणार असल्याचं किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :