मुंबई Anil Desai News : निवडणूक आयोगानं शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली, तरी सुद्धा ठाकरे गटानं 50 कोटी रुपयांचा निधी काढला, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन दिवसांपूर्वी समन्स बजावला होता. त्यानुसार त्यांना आज (5 मार्च) चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. अनिल देसाई आज सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर जवळपास 8 तास त्यांची चौकशी झाली. चौकशीनंतर अनिल देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले अनिल देसाई? : या चौकशी संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अनिल देसाई म्हणाले की, "चौकशीवेळी विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याला ज्याच्या त्याच्या पक्षप्रमुखानं एक पद दिलेलं असतं. त्यानुसार प्रत्येकजण आपलं कार्य करतो. आज ईओडब्ल्यूकडून करण्यात आलेल्या चौकशीला मी सामोरं गेलो. ईओडब्ल्यूला ज्या प्रकरणावर स्पष्टीकरण हवं होतं ते मी दिलंय. माझ्यावर कोणताही आरोप नसून मला केवळ प्राथमिक चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं."
नेमकं प्रकरण काय? : शिंदे गटाच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेनं उद्धव ठाकरे गटाविरुद्ध प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सचिव सचिव संजय मोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक तपासाची चक्रे फिरवली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचा हवाला देत लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बगल देत उद्धव ठाकरे गटानं अधिकृत असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्याचं टीडीएस आणि प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा -