मुंबई - महाविकास आघाडीने काल संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रत्येकी ८५ जागांचं वाटप केलंय. अशात आता शिवसेना १०० जागा लढणार, त्याकरिता दोन षटकार लगावणार, असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचबरोबर ज्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यांची सरकार स्थापनेनंतर योग्य ती भरपाई केली जाईल, असं सांगत बंडोबांना शांत करण्याचं कामसुद्धा संजय राऊत यांनी केलंय, मुंबईत ते बोलत होते.
शेवटच्या क्षणीही बदलले जाऊ शकतात उमेदवार: याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी २८८ जागांवर निवडणूक लढणार याबाबत कुठलीही शंका नाही, काल आम्ही तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर उमेदवारांची घोषणा केलीय. उर्वरित जागेवर आज सायंकाळपर्यंत निर्णय होईल. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आता जास्त घोळ घालून चालणार नाही. अगदी शेवटच्या क्षणीही उमेदवार बदलले जाऊ शकतात. तुम्ही आमच्या बेरजेवर जाऊ नका, महाराष्ट्रात आम्ही १७५ जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे, असंही ते म्हणालेत.
सेंचुरी मारायला अजून २५ ओव्हर बाकी : महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना १०० जागा घेईल, अशी अपेक्षा आहे. आता त्यांच्याकडे ८५ जागा असून, १०० जागांसाठी अजून त्यांना १५ जागांची गरज आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही आता ८५ जागा घेतल्यात. सेंचुरी मारायला आम्हाला दोन षटकारांची गरज आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आम्ही सेंचुरी मारणार कारण अजून २५ ओव्हर बाकी आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण २८८ जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत प्रत्येकी ८५ अशा २५५ जागांचं वाटप झालं असून, उर्वरित ३३ जागांपैकी १८ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवलीय. अशात उरलेल्या १५ जागा कुणाच्या पदरात किती जागा येतात, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेस १०० जागा लढवेल, असा दावा केला असल्याने शिवसेना १०० कशी गाठणार हा सुद्धा प्रश्न आहे.
सरकार आल्यावर भरपाई केली जाणार : संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, ज्यांना उमेदवारी भेटली नाही, त्यांच्याविषयी मला तीव्र वेदना आहेत. कारण कार्यकर्ते ५ वर्षे काम करतात. अनेक गोष्टी करत असतात. परंतु निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये ते काही कारणाने मागे पडतात, हे फार दुर्दैवी आहे. परंतु अशा लोकांना ज्यांना उमेदवारी डावलली गेली आहे, त्यांची भरपाई सरकार आल्यानंतर केली जाईल, असेही ते म्हणालेत.
निवडणूक एक रणभूमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवतायत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी दिली गेलीय. परंतु २०१९ विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक ही रणभूमी आहे आणि ती सर्वांनी लढवायला पाहिजे. महाराष्ट्रद्रोह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जे मदत करीत आहेत. त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी जे गर्जना करत होते. ते अप्रत्यक्षपणे मोदी आणि शाह यांना हा महाराष्ट्र गिळता यावा, यासाठी मदत तर करत नाहीत ना? हे या राज्याची जनता या वेळेला काळजीपूर्वक पाहणार आहे. शिवसेना असा पक्ष आहे, ज्याने कधीही महाराष्ट्रद्रोह्यांशी हातमिळवणी केली नाही. महाराष्ट्रासाठी अनेक वार झेलले, लढत राहिली व यापुढेही लढत राहील. याकरिता जे आमच्या सोबत येतील ते महाराष्ट्राचे आणि जे आमच्या सोबत येणार नाहीत ते शत्रूंना मदत करीत होते. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात होईल, असं सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला लगावलाय.
हेही वाचा -