मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असताना त्यांना स्पष्ट बहुमत कसं मिळालं? आम्हाला ज्या अपेक्षित जागा मिळणार होत्या किंवा आमदार येणार होते. तेवढे सुद्धा आमचे आमदार आले नाहीत, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसंच निकालात घोळ असून, ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधक ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन आमनेसामने आले आहेत. मंगळवारी (10 डिसेंबर) उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन केलं, तर ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं.
मग ईव्हीएम मशीन भारतात का? : ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं. "ईव्हीएम विसर्जित केली, नाहीतर लोकशाही विसर्जित होईल. प्रगत देशात ईव्हीएम मशीन नाही मग भारतात का?," असा सवाल अखिल चित्रे यांनी यावेळी उपस्थित केला. "ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा", असं म्हणत अखिल चित्रे यांनी यांनी ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन केलं. ईव्हीएम विरोधात राज्यभर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी देखील ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. "आम्ही जेवढं मतदान केलं, तेवढं मतदान उमेदवाराला मिळालं नाही. त्यामुळं मतदानासाठी ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर पुन्हा निवडणुकी घ्या," अशी मागणी मारकडवाडीमधील ग्रामस्थांची आहे.
हेही वाचा