मुंबई : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात उद्धव ठाकरे यांनी विविध अश्वासनं दिले आहेत. उबाठा पक्षानं जाहीर केलेल्या या जाहीरनाम्याला वचननामा असं नाव दिलं आहे. या वचननाम्यावर क्यूआर कोड सुद्धा देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही कोळीवाड्याची ओळख पुसू देणार नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्या जाहीरनाम्याची अनेक वचनं महाविकास आघाडीच्या जाहीरनामा सोबतची आहेत. धारावीमध्ये वित्तीय केंद्र उभारू, नोकरी नोकरी आणि नोकरी या आमच्या तीन प्राथमिकता आहेत, असंही या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला वचननामा : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. हा वचननामा पॉकेट साईज म्हणजेच खिशात मावणारा असून त्यावर एक क्यूआर कोड सुद्धा आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार आपल्या मोबाईल स्क्रीनवर तो पाहू शकतात. वचननाम्याचं प्रकाशन करतेवेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाविकास आघाडीचा वचननामा लवकरच प्रकाशित केला जाईल. पण त्यापूर्वी आम्ही आमचा वचननामा प्रकाशित करत आहोत. आमच्या आणि महाविकास आघाडीच्या वचननाम्यात जास्त अंतर नसेल. काल आम्ही आमची पंचसूत्री जाहीर केली आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही जी वचनं दिली ती पूर्ण केली. आमचा वचननामा हा दोन प्रकारचा आहे. यापूर्वी शिवसेनेनं मुंबईकरांना सागरी पुलाचे आश्वासन दिलं होतं. ते वचन आम्ही पूर्ण केलं आहे."
गुजरातला पळवलेलं वित्तीय केंद्र धारावीत उभं करू : उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, "कोळी समाजाची ओळख आम्ही कुठल्याही परिस्थितीत पुसू देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर कोळी समाजाच्या क्लस्टर विकासाचा जीआर आम्ही रद्द करू. आताच्या मिंधे सरकारच्या कारभारात बेरोजगारी विषयी कोणतीही तरतूद दिसत नाही. बेरोजगारीनं राज्यात कळस गाठला आहे. यांनी फक्त गद्दारांना नोकऱ्या दिल्या. परंतु सर्व सामान्य जनतेला काहीच दिलं नाही. आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातील बेरोजगार भूमिपुत्रांना, मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल. तसेच मुंबईतील वित्तीय केंद्र या सरकारनं गुजरातला पळवून लावलं. परंतु आम्ही ते केंद्र धारावीतच उभं करू आणि येथील जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊ. तसेच राज्यात मुलींना ज्या पद्धतीनं मोफत शिक्षण दिलं जाते. त्या पद्धतीचं मोफत शिक्षण आमचं सरकार आल्यानंतर मुलांनाही दिलं जाईल. पाच जीवनावश्यक वस्तूंचा दर स्थिर ठेवण्यावर आमचा भर असेल."
वचन नाम्यातील प्रमुख आश्वासने :
महिला : महिलांना मिळणाऱ्या सरकारी अर्थसहाय्यात वाढ करणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर 24 तास सुरू राहणारी महिला पोलीस चौकी उभारली जाईल.
शिक्षण : मुलींप्रमाणे राज्यात मुलांनाही जात-पात - धर्म न पाहता मोफत शिक्षण दिले जाणार.
अन्नसुरक्षा : तांदूळ, गहू, डाळ, तेल आणि साखर या पाच जीवनाश्यक वस्तूंचे भाव दोन वर्ष स्थिर ठेवणार.
आरोग्य : प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
रोजगार : भूमिपुत्रांना स्थानिक उद्योगांमध्ये प्राधान्याने स्थान देणारं धोरण राबवणार. मोठ्या प्रमाणात औद्योगिक केंद्र उभारले जातील.
शेतकरी : 50 हजार कोटींचे विक्रमी पॅकेज देण्यासोबत पिकाला हमीभाव देणार.
हेही वाचा :