मुंबई Lok Sabha Election 2024 : आज भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चार जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच उर्वरित ज्या आपल्याकडील जागा आहेत. त्या देखील लवकरच जाहीर होतील, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
चार जागांवर उमेदवारी जाहीर : यावेळी ठाकरे गटाकडून चार जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "जळगावची जागा आमची आहे. पण मी सांगतो तुम्ही लिहून घ्या, कल्याणच्या जागेवर वैशाली दरेकर यांना उमेदवारी मी जाहीर करतो. हातकणंगलेच्या जागेवर सत्यजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी मी जाहीर करतो. तर जळगावमध्ये करण पवार यांना उमेदवारी देण्यात येत आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चार जागांची उमेदवारी जाहीर केली.
ठाकरे गटाच्या जाहीर झालेल्या चार जागा :
- कल्याण - वैशाली दरेकर
- पालघर - भारती कामडी
- जळगाव - करण पवार
- हातकणंगले - सत्यजीत पाटील
देशानं आज भूकंप पाहिला : "गेले काही दिवस बातम्या येत होत्या, आश्चर्यकारक भूकंप येणार आहे, असं म्हणत होते. मी म्हटलं भूकंपात आश्चर्यकारक असं काय असतं. पण उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा आजचा भूकंप देशानं पाहिला आहे. कोणी कुठंही गेले तरी शिवसेनेला धक्का..., शिवसेनेला कोणी धक्का देऊ शकत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "सत्ताधारी पक्षातून आज पाटील विरोधी पक्षात आले आहेत. सत्ताधारी पक्ष व्हावा म्हणून आज उन्मेष पाटील यांनी पक्षप्रवेश केला आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेनं चालला आहे. एका पक्षाची जरी सत्ता आली तर देश संपला म्हणून समजा. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलं. त्यांना भाजपानं फेकून दिलं आहे. हे खरं बंड म्हणात येईल, पूर्वी झाली ती गद्दारी होती," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सांगलीच्या जागेवर दावा कायम : "सांगलीची जागा आमच्याकडं आहे आणि त्याची चर्चा थांबलेली आहे. उद्या-परवा संजय राऊत तिकडं जातील," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. "आता हातकणंलेमध्ये राजू शेट्टी यांच्यासोबत आमची बोलणी सुरु होती. आता तिथं आमच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, वंचितसोबत दीड वर्षांपूर्वी आमची युती झाली होती. देशातील हुकूमशाहीला विरोध करण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आम्हा दोघांनाही मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. जरी प्रकाश आंबेडकर काही टीका करत असतील, तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही. भविष्यात आम्ही एकत्र येणारच नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेऊ नये," असं आवाहन देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना केलं.
हेही वाचा :