पेरलं तेच उगवणार! दबावतंत्र आणि अंतर्गत कलहामुळं शिंदे गटात नाराज मंडळी बंडाची भूमिका घेणार? - LOK SABHA ELECTION 2024 - LOK SABHA ELECTION 2024
LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून काही जागांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून आठ जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, आठपैकी हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली. भावना गवळींचं तिकीट कापल्यामुळं भावना गवळींच्या भावना दुखावल्या. शिंदे गटातील अजून दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्था का पसरली आहे का? पाहूया.
Published : Apr 5, 2024, 7:12 PM IST
मुंबई : LOK SABHA ELECTION 2024 : महायुतीत अद्यापपर्यंत भाजपाने 22 उमेदवारांची महाराष्ट्रात यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना (शिंदे गटाने) 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. उर्वरित काही जागांवर महायुतीत एकमत होत नाही. 9 जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर नाशिक, ठाणे आणि कल्याण येथे शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, या ठिकाणीही भाजपाकडून उमेदवारीची मागणी होत आहे. तर, दुसरीकडे नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना डावलून अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये भाजपाकडून कुठंतरी शिंदे गटावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं, दबक्या आवाजात शिंदे गटात बोललं जात आहे. मात्र, यावर उघडपणे कोणीही भाष्य करण्यास तयार नाही. महायुतीत सर्व काही आलबेल आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागा वाटपाची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, तिढा योग्य पद्धतीने सुटेल असं तिन्ही पक्षातील नेते सांगत आहेत. मात्र, भाजपाकडून शिंदे गटावर कुरघोडी केली जाते. त्यामुळं शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली असून, याबाबत त्यांनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली आहे.
जाहीर झालेली जागा बदलण्याची शिंदेंवर नामुष्की : शिंदे गटाने 8 जागांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक कल्याण, ठाणे आणि मुंबईतील काही जागांचा यादीत समावेश नाही. मात्र, ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे, त्या ठिकाणीही भाजपाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटीलांच्या विरोधात आपण प्रचार करणार नसल्याचं उघडपणे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. येथे दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपानेही मुख्यमंत्र्यावर दबाव टाकला. अखेर गुरुवारी हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली. हेमंत पाटलांच्या ऐवजी दुसरा उमेदवार द्यावा लागला. तर अजूनही जाहीर झालेल्या जागामधून दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये एक जागा म्हणजे हातकणंगले येथे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांच्याविषयी स्थानिक पातळीवर भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे. सन्मानपूर्वक वागणूक मिळावी त्यानंतर आपण मानेंचा प्रचार करू असं भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हातकणंगल्याचा देखील उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. याव्यतिरिक्त आणखी एक जागा बदलण्यात येणार असल्याचीही दाट शक्यता आहे.
शिंदे गटातील नेते वेगळी भूमिका घेणार? : भाजपाकडून शिंदे गटावर दबाव असल्यामुळे शिंदेंचा एक गट अस्वस्थ आहे. तसंच, शिंदे गटातील अंतर्गत कलहामुळे, मतभेदामुळे आणि शिंदेंच्या आदेशाव्यतिरिक्त कोणी कोणाचे आदेश मानत नाही, यामुळं पक्षात समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूपच धूसर आहे. दुसरीकडे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते प्रचंड नाराज झालेत. दुसरीकडे यवतमाळ-वाशिमचे विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असून, गुरुवारपासून त्या नॉटरिचेबल आहेत. मूळ शिवसेनेतून बंड करताना एकनाथ शिंदेंनी आमदार-खासदारांना पुन्हा तिकीट देऊन निवडून आणू असं जे वचन दिलं होतं त्यात ते कुठेतरी कमी पडताना दिसताहेत. परिणामी शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सतत भाजपाकडून होणारा दबाव आणि मिळणारी वागणूक यामुळे शिंदे गटातील नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात. किंवा ते बंड ही करू शकतात, असं राजकीय क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार यांनी म्हटलंय.
त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार : भाजपाकडून शिंदे गटावर दबाव आहे. तुमच्यावर उमेदवार बलण्याची वेळ आली आहे. भावना गवळींना तिकीट मिळालं नाही. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलावी लागली. यामुळे तुमच्यातील काही नेते बंड करू शकतात किंवा वेगळी भूमिका घेऊ शकतात, असं शिंदे गटाला विचारलं असता "जरी या दोघांना तिकीट मिळालं नाही तरीसुद्धा शिंदेसाहेब हे कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांचे राजकीय पुनर्वसन नक्कीच करतील. त्यामुळं काही काळजी करु नका, असं कित्येक महिन्यांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणारे शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी म्हटलं आहे. "तर ज्या स्वत:च्या वाट्याच्या जागाही शिंदे गटाला आपल्याकडे राखता आल्या नाहीत. जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची यांच्यावर वेळ येते यातच यांचं अपयश अधोरेखित होतं. यातून भाजपा त्यांचा कसा वापर करतंय हे दिसून येतंय, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
विकासकामांसाठी तडजोड : "एकनाथ शिंदे साहेब हे एक सक्षम नेतृत्व आहे. लोकसभा जागा वाटपावरुन जे काही बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये काही राजकीय समीकरणं, राजकीय गणितं असतात. त्यामुळं तडजोड करावी लागली. त्यामुळं शिंदे साहेब कोणावरही अन्याय करणार नाहीत. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत. जागा वाटबाबत जे काही बदल दिसत आहेत ते विकासाच्या दृष्टीने विकासकामांसाठी. राज्याचा हितासाठी घेतलेला निर्णय आहे. शिंदे सर्वांना न्याय देतील. कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. विरोधकांनी उगाच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये, असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या, प्रा. शिल्पा बोडखे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
1 मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी 4 जागांवर अद्यापही उमेदवारीबाबत घोळ कायम - Mumbai Lok Sabha Seats