ठाणे Ramdas Kadam On Ravindra Chavan : महाराष्ट्र जिंकण्याच्या इर्षेनं सक्रिय झालेल्या महायुतीमध्येच ठिणगी पडली आहे. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपत नाही, याचं दु:ख वाटते. नुसते पाहणी दौरे कशासाठी करता ? असा परखड सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा चमकोगिरी करणार्या कुचकामी रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजिनामा घ्यावा, असा घरचा आहेर शिवसेना रामदास कदम यांनी दिला. विशेष म्हणजे ठाण्यात मेळाव्याच्या निमित्तानं येत त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचल्यानं आता भाजपा गोटात नाराजी व्यक्त होत आहे. रामदास कदम यांच्याशी यासर्वच संदर्भात थेट विचारलं असता, ईटीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले, "शंभर टक्के युती तोडण्याचा प्रयत्न होतोय."
गणरायाचा प्रवासही होणार खड्ड्यातून : ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायत इथं शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजपा नेत्यांपर्यंत त्यांनी समाचार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या मुंबई - गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना खडे बोल सुनावले. "प्रभू रामाचा वनवास 14 वर्षानं संपला. पण मुंबई - गोवा महामार्ग झाला नाही. या मार्गाची अत्यंत वाईट अवस्था आहे. आता गणपती येणार आहेत. गणरायाचा प्रवासही या खड्ड्यातूनच होणार आहे. या मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. पण आम्ही असं काय पाप केलं," असा संतापही रामदास कदम यांनी व्यक्त केला. "या महामार्गाची जबाबदारी असलेले मंत्री चमकोगिरी करण्यासाठी केवळ पाहणी दौरे करत आहेत. त्यांचा राजिनामा घ्या," असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.
खरी शिवसेना बाळासाहेबांची : शिवसेना नेमकी कोणाची याबाबत बराच वाद होत आहे. शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा एकनाथ शिंदे आणि उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. याब्बत रामदास कदम यांनी भाष्य केलं. "दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना आहे. त्यांचा वारसा आम्ही पुढं घेऊन जात आहेत," असं यावेळी रामदास कदम म्हणाले.
कोकणात महायुतीला कोणताच अडथळा नाही : कोकणात महायुतीला कोणताच अडथळा येणार नाही. पण दापोली विधानसभेवरुन मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. "2019 साली युती असतानाही भाजपानं योगेश कदमला मतदान केलं नाही. आता योगेश कदमला तर बदनाम करण्याचं काम सुरू आहे. यासंदर्भात पंतप्रधानांसह सर्वांना पत्रव्यवहार केला आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आहोत, तरी दापोलीच्या भाजपा पदाधिकार्यांचं कारस्थान कसं आहे, याविषयी त्यात सविस्तर लिहिलं आहे."
उद्धव ठाकरेंनी मागितले खोके, रामदास कदम यांचा आरोप : यावेळी बोलताना रामदास कदम यांनी उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करत आरोप केले. या बोलताना ते म्हणाले की, "कोकणात आघाडीची शीतपेय निर्मिती करणारी कंपनी येणार होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्या कंपनीच्या डायरेक्टरकडं खोके मागितले होते. त्यामुळे त्या कंपनीनं आपला प्रकल्प इतर ठिकाणी हलवला. या घटनेतील सत्य बाहेर काढयचं असेल, तर त्या कंपनीच्या डायरेक्टरला विचारा," असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :