शिर्डी Shirdi Sai Sansthan Election : शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक होणार आहे. येत्या 11 फेब्रुवारीला यासाठी मतदान पार पडेल. 17 जागेसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दोन उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.
संस्थेची 150 कोटी रुपयांची उलाढाल : साईबाबा संस्थान कर्मचारी एम्प्लॉइज सोसायटी ही साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी प्रसाद विक्री काउंटर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टॅन्ड अशा सुविधा भक्तांना पुरवल्या जातात. या संस्थेची वर्षाकाठी 150 कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून सोसायटीच्या सभासदांना कमी व्याज दरात कर्ज पुरवठा तसेच विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.
कोणते पॅनल निवडणुकीच्या रिंगणात : यंदा होत असलेल्या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थक कर्मचाऱ्यांच्या दोन पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. तर या दोन्ही पॅनलला आव्हान देत विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास पॅनल उभा करण्यात आला आहे. याबरोबर विखे समर्थक प्रताप कोते यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅनल निवडणूक लढवत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांचे समर्थक असलेल्या संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली साई हनुमान मंडळ यांनीही पॅनल उभा केला आहे.
11 फेब्रुवारीला मतदान : या निवडणुकीत 17 जागांसाठी 1650 सभासद मतदान करणार असून येत्या 11 फेब्रुवारीला मतदान पार पडेल. गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था विखें समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत सभासद विखे सर्मथक असलेल्या दोन पॅनलच्या हातात सत्ता देतात की अन्य पॅनलला साथ देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचलंत का :