शिर्डी : दरवर्षी आश्विन आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी दीपावली निमित्त शिर्डी येथील साईबाबा मंदिरात भक्तांची मांदियाळी बघायला मिळते. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिवाळी हा सण शिर्डीत साजरा केला जातो.
असं म्हटलं जातं की, इथं अनेक वर्षांपूर्वी साईबाबांनी पाण्यानं दिवे पेटवले होते. त्याचीच आठवण स्वरूप गुरुवारी (31 ऑक्टोबर) हजारो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेनं साईबाबांच्या द्वारामाई समोरील प्रांगणात रांगोळी काढून त्यावर तब्बल अकरा हजार दीप प्रज्वलित करत 'मेरे साई भगवान' असं लिहित दीपोत्सव (Shirdi Sai Baba Temple Diwali Utsav) साजरा केला.
'साई मेरे भगवान'चा संदेश : गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीतील क्रांती युवक मंडळाच्या वतीनं दिवाळी सणानिमित्तानं 'दीपोत्सव' आयोजित करण्यात येतो. या दीपोत्सवात हजारो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. यंदाही हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. तसंच यावेळी मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलित करत 'मेरे साई भगवान'चा संदेश देण्यात आला. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आल्यानंतर दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
साईबाबांची बदनामी करणाऱ्यां विरोधात साई संस्थान करणार कारवाई : शिर्डी साईबाबा मंदिरावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर तसंच साईबाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात साई संस्थानच्या वतीनं शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून साईबाबांची बदनामी करणाऱ्या काही लोकांवर देखील साई संस्थान गुन्हा दाखल करणार असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं. दिवाळीनिमित्त अनेक भाविकांनी कुटुंबासह साईंचे दर्शन घेतले.
हेही वाचा -