शिर्डी Shirdi Ganeshotsav 2024 : साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असाल तर तिथं साईंबरोबर श्री केदारनाथाचंही दर्शन तुम्हाला घेता येणार आहे. शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्तानं केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा शहरातील साईश चौकात साकारण्यात आलाय. हा देखावा शिर्डीकरांसह भाविकांचे लक्ष वेधून घेतोय.
केदारनाथ मंदिराचा देखावा : शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं गेल्या सोळा वर्षांपासून गणेशाची स्थापना केली जाते. दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या या मंडळानं गेल्या वर्षी अमरनाथ मंदिराचा आणि चंद्रयान 3 चा देखावा साकरला होता. यंदाच्या वर्षी हुबेहूब केदारनाथ मंदिराचा देखावा या मंडळानं साकारलाय.
केदारनाथ बाबांचं दर्शन शिर्डीत : केदारनाथ मंदिराचा हा देखावा 40 बाय 60 फूट लांबीचा असून, 40 फूट उंची आहे. देखाव्याच्या प्रवेशद्वारासमोरच मोठा 'महानंदी' व आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नंदी असे दोन नंदी बसवण्यात आले आहेत. येथील 'शिवलिंग' देखील हुबेहूब केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर साकारण्यात आलंय. देखावा बघण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना थेट केदारनाथ मंदिरातच आल्याचं जाणवतं.
देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यातील अनेक भाविक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. श्री केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी कधी जाता आलं नाही. मात्र, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बाबांच्या दर्शनाबरोबरच बाबा केदानाथाचंही दर्शन घडलं असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे. महाराष्ट्रापासून हे मंदिर खूप लांब असल्यानं अनेक भाविकांना तिथं जाणं शक्य होत नाही. केदारनाथ मंदिर चार धाम पैकी एक धाम आहे. या मंदिराला खूप महत्व असल्यानं येथे भाविकांची गर्दी असते.
हेही वाचा -
- बटनांचा वापर करून तयार केला बाप्पांचा महाल, पाहा व्हिडिओ - Ganeshotsav 2024
- एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ... - Ganeshotsav 2024
- 'असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा', मुंबईतील तरुणीच्या घरी चॉकलेटचे बाप्पा विराजमान, 'असं' केलं जाणार विसर्जन - Ganeshotsav 2024