मुंबई Dispute In Mahayuti : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा बोलबाला आहे. एकीकडं विरोधक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली असल्याचा आरोप करताना दिसताय. तर दुसरीकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं बघायला मिळतंय. परिणामी महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या यात्रेत 'मुख्यमंत्री' हा शब्द काढून 'माझी लाडकी बहीण योजना' असे गुलाबी बॅनर दिसून आले. यानंतर 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' असे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आले. त्यामुळं पक्षांतर्गत समन्वय साधण्यात महायुती अपयशी ठरली का?, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय.
बैठकीत मंत्र्यांची नाराजी : राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी (5 सप्टेंबर) पार पडली. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आलेल्या प्रचारावरुन शिवसेना (शिंदे गटाचे) मंत्री दादा भुसे आणि मंत्री दीपक केसरकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आलीय. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' ही योजना महायुती सरकारची आहे. पण याचं एका पक्षानं श्रेय घेता कामा नये, असा नाराजीचा सूर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी लावला. यावेळी काही प्रमाणात राडा झाल्याचं देखील बोललं जातं होतं. मात्र, बैठकीत असं काहीही झालं नसल्याचं राष्ट्रवादी, शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलंय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : "महायुतीत लाडक्या बहिणींवरुन श्रेयवादाची लढाई कुठंही नाही. सरकारमध्ये कुठलीही योजना आली तर त्याचं श्रेय हे मुख्यमंत्र्यांचं असतं. या योजनेचा तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचार करताय. पण लाडकी बहीण योजनेचं खरं श्रेय जर कोणाचं असेल तर आमच्या बहिणींचं आहे. कारण ही योजना त्यांच्यासाठी आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा. या दृष्टीनं तिन्ही पक्ष प्रयत्न करताय", असं देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
श्रेय तिन्ही पक्षाचे : "एकच वादा अजितदादा, ही घोषणा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिली. ही घोषणा फक्त लाडक्या बहिणीसाठीच नाही. तर यापूर्वीही आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांबद्दल घोषणा दिल्या गेल्या किंवा पोस्टरबाजी करण्यात आलीय. त्यामुळं केवळ या योजनेसाठी ही घोषणाबाजी होती, असं म्हणता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारची असून त्याचं श्रेय तिन्ही पक्षाचं आहे,"अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पुढच्या वेळेस दुरुस्ती करु : यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, "महायुतीत सर्वकाही अलबेल आहे. आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार करताना अजितदादांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी 'एकच वादा, अजितदादा' अशी घोषणाबाजी केली. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचं आम्ही श्रेय घेतोय, असा याचा अर्थ होत नाही. हे महायुतीचं श्रेय आहे. आमच्या पहिल्या यात्रेत ज्या काही बॅनरवर त्रुटी दिसल्या. त्यात सुधारणा करून पुढच्या टप्प्यातील यात्रेत आम्ही संपूर्ण योजनेचं नाव लिहू." तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा किंवा राडा झाला नाही. केवळ या योजनेवर चर्चा झाली आणि सूचना देण्यात आल्या. परंतु याला आपण जर हंगामा किंवा राडा झाला म्हणत असाल तर हे चुकीचं आहे, असंही उमेश पाटील म्हणाले.
हेही वाचा -
- "भावांनो, योजनेचे पैसे बँकेनं कट केले"; लाडक्या बहिणींची आर्त हाक, महिलेला रडू कोसळलं - Majhi Ladki Bahin Yojana
- सरकारची बदनामी करणं भोवलं; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा, लाडकी बहीण योजनेवरुन केला होता 'हा' आरोप - FIR Against Jitendra Avhad
- मुदत संपूनही 'या' तारखेपर्यंत भरता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज, पण पैसे किती मिळणार? - majhi ladki bahin yojana