अहमदनगर Nilesh Lanke Meet To Balasaheb Thorat : येथील दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाच्यावतीनं पारनेरचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी आमदार निलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात उपस्थित होत्या. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, "बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केलं आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मियता आहे, त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात आहेत."
यामुळे घेतली थोरातांची भेट : "2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं मदत केली. विधानसभेत नवीन आमदारांना मदत आणि मार्गदर्शन करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यानं आज त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचं" आमदार निलेश लंके यांनी सांगितलं.
निलेश लंके झटणारे कार्यकर्ते : आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, "आमदार निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा, पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्यानं काम करणारं नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचं नातं आहे. नगर दक्षिणमध्ये समोरचे उमेदवार मोठे आहेत, मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई अशी होणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके यांचे मोठे यश राहणार आहे."
निलेश लंकेंच्या विजयाचा विश्वास : "हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील 'इंडिया' आघाडीचे राहणार आहे," असंही आमदार थोरात यांनी सांगितलं. "अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे नक्कीच विजय होतील," अशा शुभेच्छाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा :