मुंबई Maratha Reservation : मराठा ठोक मोर्चाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं होतं. तसंच शरद पवार यांच्या घराबाहेर देखील आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, शरद पवार सध्या दिल्लीत असल्यानं सिल्वर ओकला केलं जाणारं आंदोलन मागं घेण्यात आलय. त्यानंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी आपला मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे वळवला. मात्र, मुंबई पोलिसांनी मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांना गिरगाव येथे ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबई पोलीस केरे पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ यांना घेऊन सागर बंगल्यावर दाखल झालं.
आरक्षणावरून राजकारण : सागर बंगल्यावरील बैठकीनंतर रमेश केरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आम्ही यापुढं देखील मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत या नेत्यांसह त्यांच्या पक्षाच्या भूमिका काय आहेत, याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यावेळी पोलिसांनी आमची अडवणूक केली, तर आम्ही तिथंच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करू", असा इशारा त्यांनी दिला. आमच्या आरक्षणावरून राजकारण केलं जात आहे. येत्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील रमेश केरे पाटील यांनी दिला आहे. केरे पाटील यांनी शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय.
पवार मराठा समाजाचे मारेकरी : आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत भाजपाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केलीय. यासंदर्भातील निवेदन देखील आम्ही देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं का? याबाबत भाजपानं आपली भूमिका जाहीर करावी. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपण माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं आश्वासन" दिल्याचं केरे पाटील यांनी म्हटलं आहे. 'शरद पवार चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळं तेच खरे मराठा समाजाचे मारेकरी आहेत, असं देखील आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याचं त्यांनी म्हटलं.
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास : शरद पवारांनी ओबीसींसाठी मंडल आयोग आणला. मात्र, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळण्याबाबत त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. आता मराठा समाजासाठी एकत्र येण्याची वेळ असताना, हे नेते मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत एकत्र येताना दिसत नाहीत. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आम्हाला देखील शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं, या सर्व पक्ष नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा बांगलादेश सारखा उद्रेक आपल्याकडं होऊ शकतो, असा इशारा केरे पाटील यांनी दिला.
'हे' वाचलंत का :
- बांगलादेशातील परिस्थितीवर सरकारचं बारीक लक्ष; परराष्ट्र मंत्र्यांची माहिती, विरोधकांचा पाठिंबा - Bangladesh Crisis Updates
- “शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून...”: बांगलादेशमधील परिस्थितीबाबत संजय राऊतांचं विधान, केंद्राला दिला इशारा - Sanjay Raut on Bangladesh Protest
- अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh