पुणे Sharad Pawar On Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे, अशी टीका केली होती. मंगळसूत्राच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. "निवडणूक आयोगाकडं देशभरातून 11 हजार तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान देशाच्या ऐक्याला धक्का देणारं आहे," अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
पंतप्रधानांचं विधान देशाच्या ऐक्याला धक्का देणारं : "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं विधान अतिशय धक्कादायक आहे. पंतप्रधान हे देशाचे आहेत, की एका विशिष्ट घटकाचे आहेत. एकूणच त्यांचं या संबधीचा दृष्टिकोन हा चिंताजनक आहे. त्यांचं हे विधान देशाच्या ऐक्याला धक्का देणारं असून याला विरोध केला पाहिजे. याबाबतची जागृती समाजात केली पाहिजे," असं यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध : पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूक 2024 चा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी शरद पवार हे माध्यमांसोबत बोलत होते. गुरुवारी अमरावतीत अमित शाह यांनी पवारांवर टीका करत पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असं म्हटलं होतं. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "दहा वर्षात शेती संबधीचे प्रश्न वाढलेत. हा कालखंड अमित शाह यांच्या पक्षाकडं होता. त्यात त्यांनी काय केलं ते सांगावं. अमित शाह यांचं शेती संबधीचं ज्ञान मर्यादीत असून त्यावर जास्त काय बोलायचं. त्यांनी दहा वर्षात काय केलं ते सांगावं. वीस वर्षाआधी काय झालं, चाळीस वर्षा आधी काय झालं, हे विचारु नये." यावेळी अंदाजपत्रकाच्या बाबत पवार म्हणाले की, "आम्ही मर्यादीत जागा लढवत आहोत. त्यामुळे आम्ही याची अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न येऊ शकतो. मात्र आमचे खासदार संसदेत हे मुद्दे मांडत राहतील. सहकारी पक्षाकडं या मुद्यांच्या पुर्ततेसाठी आग्रह धरणार आहे," असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :