सातारा - दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श मूल्यांची जपणूक करत राजकीय वाटचाल करणाऱ्या खासदार शरद पवारांनी सोमवारी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील समाधीचं दर्शन घेऊन जनतेच्यावतीनं यशवंतरावांना अभिवादन केलं. यशवंतरावांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. याठिकाणी आल्यावर वेगळंच समाधान मिळतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजितदादांनी वाचाळवीरांना फटकारलं - विधानसभा निवडणुकीत एकेका वाचाळवीरांची वक्तव्ये ऐकल्यानंतर यशवंतरावांच्या सुसंस्कृतपणाची किती गरज आहे, हे लक्षात येतं, अशा शब्दात अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना फटकारलं. यशवंतरावाकडे एक प्रकारची शिस्त होती. विरोधकाला देखील ते मान सन्मान देत. साहित्य, कला, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचे प्रश्न समजून घेणं, ही परंपरा दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली. ती परंपरा नंतरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी टिकविण्याचा प्रयत्न केल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्र यशवंतरावांना कदापि विसरणार नाही - दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात धवल क्रांती, कृषी क्रांती झाली. एमआयडीसी, उद्योगधंद्यांमध्ये क्रांती झाली. त्या सगळ्याचा पाया रचण्याचं काम यशवंतरावांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणसाहेबांना कदापि विसरू शकत नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
यशवंत विचारानं वाटचाल करणं, हीच खरी श्रध्दांजली - आम्ही महायुतीत काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आहे. चव्हाण साहेबांच्या विचारानेच पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आमचे सर्व सहकारी वाटचाल करतात. सगळ्यांनी त्या दिशेनं पुढं गेलं पाहिजे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं, हीच यशवंतरावांना खरी श्रध्दांजली ठरेल, असं अजितदादांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा...