पुणे Sharad Mohol Murder Case : गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (31 जानेवारी) रात्री बेड्या ठोकल्या आहेत.
15 जणांना अटक : शरद मोहोळ हत्येप्रकरणी आत्तापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गणेश मारणे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर बुधवारी (31 जानेवारी) रात्री गणेश मारणे त्याच्या दोन साथीदारांसह पुणे नाशिक रोड इथून पळून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार या तिघांना कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 302 ,307,201,120(ब), 34, आर्म्स अॅक्टच्या कलम 3,7,25,27 आणि मोक्का कायद्याच्या कलम 3(1)(i), 3(2),3(4) अंतर्गत ताब्यात घेण्यात आलंय. गुरुवारी (1 फेब्रुवारी) दुपारी या तिघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
गणेश मारणेसह तिघांना अटक : याबाबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, 5 जानेवारीला पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन येथे 302 चा गुन्हा दाखल होता. सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलारसह आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. गुन्हे शाखेची 8 पथकं त्याच्या मागावर होती. गुन्हे शाखेची पथके तुळजापूर, बेंगलोर, रामेश्वर, केरळ, ओडीशा, अशा ठिकाणी पाठवण्यात आली होती. जेव्हा-जेव्हा पथकं या ठिकाणी जात होती, तेव्हा-तेव्हा मारणे पलायन करायचा. बुधवारी बातमीदारांच्या माध्यमातून मारणे नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पुणे शाखेची तीन पथकं नाशिकमध्ये पाठवण्यात आली, आणि गणेश मारणेसह त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं.
दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारीला दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी मोहोळवर मारेकऱ्यांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळला गोळी लागल्यावर त्याला पुण्यातील वनाज इथं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा -