मुंबई Ujjwal Nikam Lok Sabha Candidate : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपांनं मोठा डाव खेळला. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडं भाजपानं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केलाय.
वर्षानुवर्षे तुम्ही मला आरोपींविरुद्ध कोर्टात लढताना पाहिलं. आता भाजपानं मला नवीन जबाबदारी दिली. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे. मला माहिती आहे की, राजकारण माझ्यासाठी नवीन आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, देशाचे संविधान, कायदे आणि सुरक्षा हे माझे प्राधान्य असेल. मला उमेदवारी मिळालेला मतदारसंघ हा मुंबईचा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे - उज्ज्वल निकम, भाजपा उमेदवार
पूनम महाजन यांचा पत्ता कट : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपानं या जागेसाठी उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार असल्याचं वृत्त 'ईटीव्ही भारत'नं दिलं होतं. मात्र, या जागेसाठी भाजपा कोणाला उमेदवारी देणार याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. याच जागेवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र, भाजपानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नव्या चेहऱ्याला संधी : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना महायुतीनं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. मतदारसंघात पूनम महाजन यांच्या नावाला विरोध होता, अशी चर्चा आहे. विरोधामुळं भाजपानं नव्या चेहऱ्याला संधी दिली, अशी शक्यता आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. त्यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दहशतवादी कसाबविरुद्धच्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलं होतं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
पूनम महाजन यांचा का झाला पत्ता कट? : 2019 मध्ये खासदार पूनम महाजन एक लाख 37 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, यावेळी महाजन यांच्याविरोधात कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी संपर्क नसणे आदी कारणांमुळं भाजपानं महाजन यांचा पत्ता कट केल्याचं दिसून येत आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजपा नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. मात्र, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचं असल्यानं त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय.
हे वाचलंत का :
- पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde
- नावारूपाला येणाऱ्या नेत्यांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा, खासदार उदयनराजेंचा खळबळजनक आरोप - MP Udayanraje Bhosale
- कोल्हापूरच्या गादीपुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत; संजय राऊतांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Sanjay Raut