पुणे : ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु पंडिता डॉ. सुजाता सुरेश नातू यांचे आज पुणे येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती सुरेश नातू आणि मुलगा ओमकार, सून आणि नातू असा परिवार आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ज्या काळात कथक नृत्यकलेकडे अवहेलनेने पहिले जात होते त्या नृत्यकलेला जनमानसात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात आणि ती कला घराघरात पोहोचविण्यात डॉ. सुजाता नातू यांचे मोठे योगदान होते.
त्यांचा जन्म बडोदे येथे झाला. महाराजा सयाजीराव युनिवर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात बी.ए., बी.म्युज आणि एम.म्युज.(कथक), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून एम.ए.(पॉलीटीक्स), एस.एन.डी.टी., मुंबई येथून पी.एच.डी. प्राप्त केली.
महाविद्यालयीन जीवनात अॅथलेटिक्स आणि खो -खोमध्ये त्या पारंगत होत्या. तसेच विद्यापीठाच्या त्या कप्तान देखील होत्या. रनिंगमध्ये ऑलिंपिक सिलेक्शनपर्यंत त्यांनी मजल मारली होती. वयाच्या ९ व्या वर्षापासून जयपूर घराण्याचे गुरु पंडित सुन्दरलालजी व पंडित कुंदनलालजी यांच्याकडे त्यांनी डिप्लोमा ते एम. म्युज. पर्यंत कथक नृत्यशिक्षण घेतले.
पंडित नेहरू, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, एडमंड हिलरी यांसारख्या मान्यवरांपुढे त्यांनी एकल नृत्य सादरीकरण केले. १९६२ मध्ये युपीएससीची परीक्षा देऊन त्यांनी ऑल इंडिया रेडीओमध्ये ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून ८ वर्षे नोकरी केली.१९६७ मध्ये विवाहानंतर मुंबई येथे 'पदन्यास' नृत्यसंस्थेची स्थापना केली. मुंबई आणि कलकत्ता येथे नृत्य वर्ग घेतलेआणि अनेक कार्यक्रम देखील सादर केले.
१९७० पासून आजपर्यंत पदन्यास तर्फे शेकडो मुलींनी कथक प्रशिक्षण घेतले असून अनेक रंगमंचीय कार्यक्रम सादर केले आहेत. कथकच्या शास्त्रीय परिपुर्णते बरोबरच आधुनिकतेसाठी डॉ. सुजाता नातू यांनी विविध प्रयोग केले. कथकबरोबर समन्वय साधून शास्त्रीय संगीत, लोक संगीत इतकेच नव्हे तर पाश्चात्य संगीताबरोबर सुद्धा त्यांनी सादरीकरण केले. कथक नृत्याला समाज मान्यता मिळावी हा निदिघ्यास त्यांनी घेतला होता. त्यासाठी 'ही कला विद्येला जोडली गेल्यास तिला पुनर्प्रतिष्ठा प्राप्त होईल' हे ब्रीदवाक्य ठरवून अनेक शाळा आणि संस्थांमध्ये सादरीकरणासहित प्रात्यक्षिके केली.
अनेक शाळांमध्ये नृत्य हा एक वेगळा विषय म्हणून विभाग चालू करण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला चांगले यश मिळाले. आज जवळपास सर्व शाळांमध्ये कलाविभाग सुरु असून यामुळे अनेक नृत्यांगनांना अर्थार्जनाची संधी मिळाली आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे १९७३ पासून कथक नृत्यासाठी डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रम चालू करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठात ललित कलाकेंद्र स्थापन करण्यात व तेथे नृत्य विषयक अभ्याक्र्म आखण्यात त्यांचा सहभाग होता. विद्यापीठाकडून प्राध्यापिका म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली होती. नृत्यविषयक आठ पुस्तकांचे लेखन आणि अनेकविध विषयांवरील ५००च्या वर कविता त्यांच्या नावावर आहेत.'बालभारती'च्या हस्तपुस्तिका निर्मितीसाठी सल्लागार म्हणून ५ वर्षे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना हिंदू महासभेकडून नृत्य्चन्द्रिका हा किताब देण्यात आला होता. भारत विकास परिषदेतर्फे रणरागिणी सन्मान, पुणे महानगर पालिकेकडून सन्मान, रोटरी व इतरही अनेक संस्थांतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले होते.