मुंबई : Lok Sabha Election 2024 : लोकसभेत केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खेचण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र येत मजबुतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवरून मिठाचा खडा पडला. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष उबाठाने सर्वात अगोदर आपल्या 17 उमेदवारांची घोषणा करून जागा वाटपात आघाडी घेतली. (Mahayuti) त्यामध्ये सांगलीमधून उबाठाने चंद्रहार पाटील आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. ती नाराजी कायम असल्याचं चित्र आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच वर्चस्व : परस्पर उमेदवारांची घोषणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात ताळमेळ नसून काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. (Seat allocation of Lok Sabha ) सांगलीची जागा उबाठाला दिल्यामुळे काँग्रेस नेते विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, दक्षिण मध्य मुंबईची जागा उबाठाला दिल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. यासाठी या दोन्ही जागांसाठी दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवला गेला. परंतु, या परिस्थितीतही न डगमगता उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी सांगली तसंच दक्षिण मध्य मुंबई ही जागा आपल्याकडेच राखण्यात यश मिळवलं अशी सध्यातरी परिस्थिती आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व असल्याचं सिद्ध झालं आहे.
महायुतीत अद्याप कुरघोडी : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राज्यात 23 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये 18 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन भाग झाले. त्यानंतर 18 खासदारांपैकी 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तर 5 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णतः कमकुवत झाले. असं असतानाही महाविकास आघाडीत जागा वाटपात 21 जागा स्वतःकडे ठेवत उद्धव ठाकरे यांनी खरी शिवसेना ही आपलीच असल्याचं जवळपास सिद्ध केलं आहे. तर, दुसरीकडे खरी शिवसेना ही आमच्यासोबत आहे असा छाती ठोकपणे दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीत जागा वाटपात आतपर्यंत 10 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची घोषित केलेली उमेदवारी भाजपाच्या दबावाखातर त्यांना पुन्हा मागे घ्यावी लागली अशी नाचक्की त्यांच्यावर ओढवली आहे. तसंच, ठाणे आणि नाशिक याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला नाही. तर, कल्याण येथून श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली आहे. पण जोपर्यंत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे माझ्या नावाची घोषणा करणार नाहीत तोपर्यंत मी अधिकृत उमेदवार नाही, अशी स्पष्ट भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतल्याने भाजपा आणि एकनाथ शिंदे गटात जागावाटपावरून सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण पुन्हा समोर आलं आहे.
शिंदे शिवसेना खरी असती तर 23 जागा त्यांना मिळायला हव्या होत्या : जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सरशीबाबत बोलताना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, यामध्ये आश्चर्य व्यक्त करावं असं काही नाही. शिवसेना हा महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचे राजकारण हे महाराष्ट्रात राहणार. नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रादेशिक पक्ष संपवायचा प्रयत्न केला किंवा राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला तरीही राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांचा हात धरूनच वरती जावं लागणार आहे. शिवसेना सातत्याने लोकसभेमध्ये चांगला आकडा पाठवत आली आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये आम्ही 23 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये 18 जागा आमच्या निवडून आल्या त्यामधील 13 जण सोडून गेले. याचा अर्थ असा नाही की, खासदार सोडून गेले. कारण पक्ष, कार्यकर्ता हा जागेवरच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला आहे. याचा फायदा आमच्या मित्र पक्षाने घ्यावा अशी आमची पहिल्यापासून इच्छा होती असंही राऊत म्हणाले. दरम्यान, यंदा जागा वाटपाबाबत अगोदर असं ठरलं की, ज्यांचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्या जागा घ्याव्या. काँग्रेसकडे फक्त एकच जागा होती. राष्ट्रवादीकडे 4 जागा होत्या. त्या जागांवर त्यांचा अधिकार आणि 18 जागांवर आमचा अधिकार आहे. जे सत्य आहे, जे वास्तव आहे त्यावर चर्चा होणार. त्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. शिंदे गट हा काही शिवसेना नाही. जरी निवडणूक आयोग असं म्हणत असला तरी शिंदे यांची शिवसेना खरी असती तर त्यांना 23 जागा मिळाल्या असत्या. परंतु, आम्ही खरी शिवसेना आहोत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागा : राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21 जागा लढवत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, परभणी, शिर्डी, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ - वाशिम, हातकणंगले आणि सांगली या जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा उद्धव ठाकरे सेना लढवत आहे. मागच्या निवडणुकीत मुंबईतील 6 जागांपैकी 5 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, आत्ता काँग्रेसला मुंबईत नकोशी असणारी उत्तर मुंबईची जागा लढवावी लागणार आहे. काँग्रेसच्या आग्रह हा दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी होता. येथून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार होतं. परंतु, या जागेवर उबाठा गटाने अनिल देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेस नंदुरबार, अकोला, धुळे, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नांदेड, जालना, पुणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक व लातूर या 17 जागा लढवणार आहे. तर, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, माढा, रावेर, भिवंडी, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड अशा 10 जागा लढवणार आहे.
हेही वाचा :