मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटप बैठक सलग दुसऱ्या दिवशीही पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन बैठकीचा तपशील सांगितला. वंचित बहुजन आघाडीनं 27 जागेसह मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत कोणताही प्रस्ताव बैठकीत ठेवला नसल्याची माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज (28 फेब्रुवारी) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. राज्यातील 48 पैकी किती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं तयारी केली याबाबत वंचितनं बैठकीत माहिती दिली. कोणत्या मतदारसंघात त्यांची ताकद आहे, हे त्यांनी या बैठकीत सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित यांनी राज्यात 27 जागांवर आपली ताकद असल्याचं सांगितल्यानंतर चर्चा सुरू होती.
'महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या आजच्या बैठकीत निर्णय झाला आहे. मी काल म्हटल्याप्रमाणं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. तसंच जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद नाहीत', असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आता एकच बैठक होणार : महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? हा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे सांगितला नसला तरी जागावाटप पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. आता फक्त एकच बैठक होणार असून त्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :