सातारा Kaas Pathar Satara - देश-विदेशातील पर्यटकांना वेध लागलेल्या साताऱ्यातील कास पठारावरील फुलांच्या हंगामाचा गुरूवारी शुभारंभ झाला. पठारावर विविध प्रजातींची फुले उमलण्यास सुरूवात झाली आहे. सध्या कास परिसरात धुके आणि पाऊस असल्याने या वातावरणाचा फुलांच्या उमलण्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतरच खऱ्या अर्थाने कास पठार फुलांनी बहरणार आहे.
यंदा कारवी फुलं ठरणार पर्यटकांचं आकर्षण : टोपली कारवीच्या फुलांनी कास पठार सध्या व्यापले आहे. ही फुले सात वर्षातून एकदा उमलतात. त्याच बरोबर कोळी कारवी, इटारी कारवी ही फुले देखील उमलली आहेत. या तीनही प्रकारातील कारवीची फुले एक ते दोन महिने राहतात. यंदा ही फुले पर्यटकाचे आकर्षण ठरणार आहेत. टोपली कारवीसह चवर, दीपकांडी, आभाळी, सीतेची आसवे, सोनकी, तेरडा, भारांगी, धनगरी फेटा, तुतारी, यासारखी फुले टप्प्याटप्प्याने उमलायला सुरुवात झाली आहे.
ऑनलाईन बुकींग आणि गाईडचीही सुविधा : पर्यटकांसाठी यंदा ऑनलाईन बुकींगची (www.kas.ind.in) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच प्रति पर्यटक १५० रुपये प्रवेश शुल्क, ४५ मिनिटांकरिता १०० रुपये गाईड फी (प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या), उपद्रव शुल्क २ हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये प्रवेश शुल्क (सोमवार ते शुक्रवारपर्यंतच) आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे शाळा, कॉलेजच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांचे पत्र असणे आवश्यक आहे.
पार्किंग ते पठारापर्यंत मोफत बससेवा : कास पठारावरील यंदाच्या हंगामासाठी १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंगपासून ते कास पठारापर्यंत पर्यटकांसाठी मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पार्किंगमध्ये सहा शौचालयांची व्यवस्थाही केली आहे. ठिकठिकाणी मिनरल वॉटर आणि पर्यटकांना सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.