सातारा - फलटण तालुक्यातील विडणी गावात ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली, असं साहित्य आढळून आल्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
फलटण तालुक्यातील विडणी गावच्या हद्दीत प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी आढळून आला. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात टाकण्यात आला असावा, असा अंदाज घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी व्यक्त केला. आढळून आलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत आणि सडलेला आहे. मृतदेहाच्या कबरेखालील भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्ला असावा, अशीही शक्यता आहे. मृतदेहाचा उर्वरीत सडलेला भाग ऊसाच्या शेतातून शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आला.
पोलीस पाटील शीतल नेरकर यांनी या घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे डीवायएसपी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे आपल्या पथकासह तातडीनं फलटणकडे रवाना झाले. नरबळीचा संशय असल्यानं पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
नरबळी असण्याची शक्यता?- ऊसाच्या फडात सापडलेल्या मृतदेहाजवळ नारळ, गुलाल, केस, तेलाचा दिवा, काळी बाहुली आणि सुरी आढळून आली आहे. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा, असा दाट संशय आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह सडलेला असल्यानं ही घटना आठवड्यापूर्वी घडली असावी, असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या, मृत महिलेची ओळख पटविण्याचं प्रयत्न सुरू आहेत. मृत महिलेचं धड गायब असून कवटी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली आहे. पोलीस मृताच्या धडाचा शोध घेत आहेत. घटनास्थळाच्या आजुबाजूला ९ ते १० एकर ऊसाचे क्षेत्र असल्यानं मृतदेहाच्या उर्वरीत भागाचा शोध घेणं आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळं ऊस तोडण्याच्या सूचना पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यात सातारा जिल्ह्यात अंधश्रद्धांचे विशेषत: अघोरी अंधश्रद्धांचे प्रकार वाढले आहेत. या मृत्यूबाबत अंधश्रद्धेचा काही अँगल आहे का, याबाबत पोलिसांनी तपास करण्याची करण्याची गरज आहे- हमीद दाभोलकर, समन्वयक, महाराष्ट्र अंनिस
प्रत्येक तालुक्यात अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करा-महाराष्ट्र अंनिसचे समन्वयक हमीद दाभोलकर यांनी संशयित नरबळीच्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, " मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या विविध वस्तू पाहता नरबळीचा असण्याची शक्यता अधिक आहे. राज्य सरकारनं प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धाविरोधी कक्ष स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, त्याची अनेक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धाविरोधी कक्ष स्थापन करून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणं अंमलबजावणी कायद्याची प्रभावीपणं अंमलबजावणी करावी. तसं केलं तर असे प्रकार टळू शकतील, अशी आशा वाटते."
हेही वाचा-