सातारा : विधानसभा निवडणुकीची ड्युटी संपवून घरी निघालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तलाठ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित कदम, असं मृत तलाठ्याचं नाव आहे. सातारा पुणे महामार्गावर उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
मतपेट्या निवडणूक कर्मचारी म्हणून होती नेमणूक - रोहित कदम हे तलाठी होते. राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये मतपेट्यांच्या संदर्भातील कामासाठी निवडणूक कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक होती. मतपेट्या जमा करून मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी निघाले होते. उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जावली मतदार संघातील आनेवाडी गावात त्यांची ड्युटी होती. ते मूळचे सातारा जिल्ह्यातीलच भुईंज या गावचे रहिवासी होते.
मतदान केंद्राध्यक्षाला हृदयविकाराचा झटका - जावली तालुक्यात आणखी एका घटनेत डांगरेघर मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षांना हृदयविकाराचा झटका आला. मतदान केंद्रातील आशा सेविकांनी त्यांना तातडीनं मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. विनोद विष्णू आमले (रा. देवापूर, ता. माण), असं केंद्राध्यक्षांचं नाव आहे. दुपारच्या सुमारास हृदयविकाच्या धक्क्यानं ते खाली कोसळले होते. आशा सेविकांनी प्रथमोपचारानं त्यांना शुध्दीवर आणून रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
निवडणूक काळात मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येते. तसंच विशेष वाहनांची सुविधाही त्यांच्यासाठी करण्यात येत असते. अशा परिस्थितीतही काही घटना घडतात. त्यामुळे यातून आणखी काळजी घेण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा..