सातारा Sant Dnyaneshwar Mauli Palkhi at Satara : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज सातारा जिल्ह्यात आगमन होत असून यंदा जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा तब्बल पाच दिवस मुक्काम असणार आहे. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जाईल. तर यावेळी पाच ते सहा लाख वारकऱ्यांची उपस्थिती असेल. दरम्यान, या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय.
ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा पाच दिवस मुक्कामी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा पाच दिवस सातारा जिल्ह्यात मुक्कामी आहे. आज पालखी सोहळ्याचं सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होईल. तसंच नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गानं पालखी सोहळा सोलापूर हद्दीत प्रवेश करेल.
पालखी सोहळ्यासाठी फौजफाटा तैनात : सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. यामध्ये पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एकूण 80 अधिकारी आणि 800 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनासाठी डिजीटल ॲप तयार करण्यात आलं असून त्याच्या आधारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या कर्तव्याचं नियोजन करण्यात आलंय.
पालखी मार्गावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर : पालखी मार्गावर नजर ठेवण्यासाठी पोलीस दलानं ड्रोन कॅमेरे तैनात केले आहेत. त्यामुळं ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवता येणार आहे. याशिवाय पालखी जाणाऱ्या मार्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळं अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांना त्याची त्वरीत माहिती मिळेल.
विभागीय आयुक्तांकडून पालखी तळाची पाहणी : पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळाची पाहणी केली. वारकऱ्यांना मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्याबरोबरच निर्मलवारी आणि हरितवारीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे निर्देशही डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा -
- भंडारा उधळत माउलींचा जयघोष, जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा प्रवेश; पाहा ड्रोन व्हिडिओ - Dnyaneshwar Maharaj Palkhi
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन - Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
- संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं १९३वं वर्ष, वारकऱ्यांसाठी पेयजलापासून तर वैद्यकीय सेवांपर्यंतची सुविधा - Dnyaneshwar Maharaj Palkhi