नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, अमित शाह हेच एकनाथ शिंदे यांचं दैवत असून ते भाजपासोबत असून लाचार झाले आहेत. अमित शाह आणि मोदी काय अमृत पिऊन आले नाहीत. नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते.
काही लोक मोह, माया, लोभ, लाभ यासाठी दिल्लीला जात आहेत. रोज बातम्या येतात. पण जिथं जातात ती खरी शिवसेना नाही. पण मोह कोणाला सुटला नाही अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलो आहोत. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात कोणीही संपत नाही अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सरकारनं निवडणूक घ्यायची हिंमत दाखवली तर, नाशिकची महानगरपालिका निवडणूक होईल. ईव्हीएम सेट करून जे निवडून आले ते धक्क्यातून सावरले नाहीत. आमचं सोडून द्या. विजय वीर सावरले की, निवडणुका लागतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
शिंदेंनी ईव्हीएमचे आभार मानावेत : ईव्हीएमच्या विरोधात महादेव जानकर दिल्लीत आहेत. प्रत्येक बूथवर ईव्हीएमचे लोक बसलेले होते. त्याचा पुरावा जानकर यांच्याकडं आहे. नाशिकलाही तेच झालं आहे. बडगुजर आणि गीते यांच्या जागा जिंकणाऱ्या होत्या. मतदारांना वाटत होतं आम्ही जिंकलेलो होतो. असं म्हणतं शिंदे यांनी ईव्हीएम आणि ब्लॅक मनीचे आभार मानले पाहिजे. त्यामुळं ज्यांनी मतदान केलं त्यांचा आता ईव्हीएमवर विश्वास नाही असं, राऊत असं राऊत म्हणाले.
मुंबईचं ठरलं, नाशिकबाबत निर्णय नाही : मुंबई महानगरपालिका निवडणूकबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. नाशिकची महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं अजून ठरलेलं नाही. त्यासाठी आम्ही कोअर कमिटी स्थापन केली आहे. आघाडीतून लढलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत मात्र, आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याची माहिती राऊत यांनी दिली.
हेही वाचा :