मुंबई Sanjay Raut on Shankaracharya : ज्योतीमर्ठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल 'मातोश्री' निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांचे सहकुटुंब आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी "उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही." असं म्हटलं होतं. यावरून राजकीय वातावरणात अनेक चर्चा सुरू झाल्या असून शंकराचार्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, तर इतरांना पोटशूळ का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचं होतं. काल हिंदू संस्कार, परंपरा, रितीरिवाजानुसार त्यांचं मातोश्री मध्ये स्वागत केलं गेेलं. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मातोश्री सजवली होती. त्यांनी माननीय उद्धव ठाकरे सर्व ठाकरे परिवाराला शिवसेनेला आशीर्वाद दिले काही चर्चाही केली," असं संजय राऊत यांनी सांगितलं."
नरेंद्र मोदींनी झुकून नमस्कार केला : "उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला आहे. या प्रकारच्या विश्वासघाताला आणि फसवणुकीला हिंदू धर्मामध्ये स्थान नाही. ज्या पद्धतीने एका हिंदुत्ववादी पक्षाला विश्वासघाताने तोडलं गेलं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं गेलं हा एक प्रकारे विश्वासघात आहे. यामुळे त्यांना वेदना झाल्या आहेत. त्यांनी त्या वेदना व्यक्त केल्या ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे." हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात. याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला असेल. टीका टिपणी केली असेल याचा अर्थ असा आहे त्यांना हिंदुत्व मान्य नाही. याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसांपूर्वी एका विवाह सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला होता." याची आठवण सुद्धा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना करून दिली.
शंकराचार्यांचे भाष्य राजकीय नव्हतं : संजय राऊत पुढे म्हणाले की, "आमदार अपात्र प्रकरणी न्यायालयात आमचा खटला सुरू आहे. घटनाबाह्य सरकार विरोधात ही लढाई सुरू आहे. ती चालत राहील. परंतु आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला, आमच्यावरील अन्याया संदर्भात जी खंत व्यक्त केली, ती आमच्यासाठी फार मोठी आहे. तसेच याप्रसंगी शंकराचार्य यांनी काही राजकीय भाष्य केलं नाही. त्यांनी फक्त त्यांचं मन मोकळं केलं आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली व त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. त्या शिवसेनेचा विश्वासघाताने तुकडा पाडला, त्याला हिंदुत्व म्हणता येणार नाही. हा हिंदूंचा विश्वासघात आहे. अशा प्रकारच्या भावना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सुद्धा त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. ते त्या सोहळ्याला गेले नव्हते."
अरविंद केजरीवाल यांचा घातपात : संजय राऊत पुढे म्हणाले की, "जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्वस्थ आहे. म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्यांना जामीन मिळाला आहे. परंतु अजूनही त्यांना जेलमध्ये ठेवलं गेलं आहे. हे एक षडयंत्र आहे. जेलमध्ये त्यांचा घातपात होऊ शकतो अशी माझ्याकडे माहिती आहे, असा खळबळनक आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा
- 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024
- विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत झाला असता भूकंप; अनेक खुलासे आले समोर - Maha Vikas Aghadi Vidhan Parishad
- विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif