मुंबई - "माझ्या माहितीप्रमाणं महाकुंभ मेळ्यातील मृत्यूचा आकडा १०० हून जास्त आहे. अनेकजण बेपत्ता आहेत. कुंभमेळ्याचं राजकीय मार्केटिंग सुरू आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला भाजपा आणि योगी सरकार जबाबदार आहे," अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थितीवरदेखील मत व्यक्त केलं.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ३०हून भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून योगी सरकार आणि भाजपावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपासह उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.
भाजपाचे सीए किरीट सोमैय्या- खासदार राऊत म्हणाले,"कुंभ मेळाव्यासाठी दहा हजार कोटींचे बजेट होते. पण, एक हजार कोटी रुपयदेखील खर्च झाले नाहीत. भाजपाचे सीए किरीट सोमैय्या यांनी तिथे जायला पाहिजे. ९ हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? ते पैसे कोणाच्या खात्यावर गेले, याचा ईडीला अहवाल द्यायला हवा. कशाप्रकारे अव्यवस्था होती? कशाप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले? हे भाविकांनी माध्यमांना सांगितलं. ज्यांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कोणावर करावा, याचं उत्तर द्यावं. कुंभमेळ्यात भाजपाचे नेते आणि मंत्र्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती."
मराठा विरुद्ध ओबीसी या राजकारणात वाल्मिक कराडला प्याद म्हणून देवेंद्र फडणवीस वापरतील. सामाजिक वातावरण बिघडण्यासाठी राजकारण केलं जात आहे-संजय राऊत, खासदार
शिंदेची शिवसेनादेखील फोडली जाईल- भाजपाचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेबरोबर (यूबीटी) भाजपाची युती व्हावी, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपेक्षा व्यक्त केली. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजपाचे युतीचे समर्थक राहिले आहेत. ते आमचे- सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील यांचे आभारी आहोत. भाजपात हौसे-नौसे-गौसे आलेत. त्यांना २५ वर्षांची भाजपा-शिवसेनेची युती कळालेली नाही. चंद्रकांत पाटील यांच्यासारखीच त्यांच्या पक्षातील अनेकांची भावना आहे. अमित शाह यांचा दिल्लीत उदय झाल्यानंतर शिवसेनेचे भाजपाबरोबर वितुष्ट आले. मुख्यमंत्री पदाचा दावा करताना आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले. अमित शाह यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. कारण, त्याचे आर्थिक हितसंबंध हे मुंबईत गुंतलेले होते. शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल," असा दावा खासदार राऊत यांनी केला.
हेही वाचा-