नाशिक Sanjay Raut On Pm Modi : मनमाडची लढाई ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशी असून मला खात्री आहे इथले गद्दार आमदार आता पुनः विधानसभेत दिसणार नाहीत. गेल्या पंधरा वर्षांपासून गणेश धात्रक यांना येथील जनता आमदार म्हणून बघते, याला म्हणतात आत्मविश्वास. जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता मानते, तेव्हा जनता त्याच्या पाठिशी भक्कम उभी राहते हा महाराष्ट्राचा अनुभव आहे. एका फडतूस माणसाला आम्ही आमदार केलं, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनमाड इथं केला.
राज्यातील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी : "शिवसेना हे चार अक्षर पाठीशी असल्यामुळे हे महाशय आमदार झाले. आज स्वतःच्या विमानातून फिरतात, हेलिकॉप्टरमधून फिरतात. माझं आव्हान आहे, या गद्दारांना, तुम्ही 50-50 खोके घेऊन शिवसेनेशी गद्दारी केली असेल, तुम्ही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला असेल, पण या राज्याची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. ती जनता तुम्हाला माफ करणार नाही," अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात यांनी भ्रष्टाचार केला : खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना, "छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, यामुळे महाराष्ट्राला इतिहास आहे. गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, यामुळे औरंगजेबाचे सर्व गुण यांच्यामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 18 कोटी रुपये मंजूर असूनही केवळ 18 लाख रुपये पुतळा बनवणाऱ्या मजुराला दिले. उरलेले पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत नारायण राणेंनी वापरले," असा आरोपही संजय राऊत यांनी केला. "मनमाडचा पुतळा देखील सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आला आणि हा पुतळा देखील गळतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील गळती लागली आहे. आता आपलं सरकार येणार आहे, त्यावेळी 50- 50 लाखांच्या पुतळ्याच्या कामांची चौकशी करून यात किती भ्रष्टाचार झाला हे सगळं बाहेर काढणार आहे. मुळात गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या काळात जे काही घडलं त्या सगळ्यांना गळती लागली आहे. हजारो कोटींचा खर्च करून राममंदिर बनवलं, मात्र पहिल्या पावसात आयोध्येच राममंदिर गळायला लागलं. दोन महिने पुजारी रामावर छत्री घेऊन उभा राहिला," असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
हेही वाचा :