मुंबई Sanjay Raut Allegations : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा धुरळा उडत असताना दुसरीकडं सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपावरुन आता चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फाऊंडेशनच्या नावाखाली 500 कोटीचा घोटाळा : संजय राऊत म्हणाले की, "श्रीकांत शिंदे यांचं फाऊंडेशन आहे. त्या 'श्रीकांत शिंदें फाऊडेशन'च्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार आणि लूट झाली आहे. धर्मादायच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट सुरु आहे. हा पैसा पक्ष, निवडणूक, आमदार, खासदारांना आपल्या पक्षात घेणं, पक्ष फोडणं यासाठी वापरला जात आहे," असा गंभीर आरोप संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपावर केला आहे.
ईडी, सीबीआयमध्ये तक्रार करणार : "मुख्यमंत्री कार्यालयात बसून कंत्राट वाटप केले जात आहेत. देणग्या घेतल्या जात आहेत. हा मोठा घोटाळा आहे. एक दोन नाहीतर 500 कोटीचा घोटाळा 'श्रीकांत शिंदे फाऊडेशन'च्या माध्यमातून केला गेला आहे. धर्मादायच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लोकांकडून देणग्याच्या स्वरुपात घेतले गेले आहेत. याबाबत आपण ईडी चौकशी व्हावी, अशी मी मागणी करत आहोत. आम्ही ईडी, सीबीआय यांच्याकडं उद्या किंवा परवा तक्रार करणार आहोत. कोट्यवधी रुपयाचा हा घोटाळा मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा आहे," असंही संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र : "या घोटाळ्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी केली पाहिजे. आता मुलुंडचे नाXX पोपट यांनी यांची चौकशी लावावी. देवेंद्र फडणवीस यांचा पारदर्शी कारभार आहे. बघू हे आता काय कारवाई करतात?" असं संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भष्ट्राचाऱ्यांना पक्षात घेतलं आहे. श्रीकांत शिंदेंच्या फाऊडेशनच्या आर्थिक व्यवहारची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे," असं संजय राऊत म्हणाले.
चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू : संजय राऊत यांनी सकाळी एक्सवरुन पोस्ट केली आहे. "श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनमध्ये देणग्याच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये कसे काय जमा झाले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच "चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र देखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत, मिंधे सरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मदाय आयुक्त हिशोब द्यायला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत?" याची चौकशी झाली पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
- "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News
- 'एकनाथ शिंदे गट म्हणजे भाजपाची XXX'; संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका - Sanjay Raut
- जागावाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024