मुंबई-तळोजा येथे ॲडव्होकेट ट्रेनिंग अकादमी उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाममात्र दरात दोन एकर जमीन उपलब्ध करुन दिली आहे. त्या जागेवर लवकरच इमारत उभारण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांनी दिली. या ठिकाणी सुमारे 700 वकील बसतील अशी व्यवस्था असलेले सभागृह उभारण्यात येणार आहे.
"ॲडव्होकेट ट्रेनिंग अकादमीच्या माध्यमातून राज्यातील वकिलांना मार्गदर्शन मिळेल. त्यामधून सरकारला विविध मुद्द्यांवर कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन मिळेल, असे ॲड संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले. अकादमीत 200 ते 300 वकिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे," अशी माहिती देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या वकिलांना अध्यक्ष झाल्यासारखं वाटेल - बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर संग्राम देसाई म्हणाले, "1961 मध्ये ॲडव्होकेट ॲक्ट लागू झाल्यापासून प्रथमच सिंधुदुर्गातील वकिलांतर्फे या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यामध्ये विजयी होऊन पहिल्याच वेळी अध्यक्ष पदाची संधी मिळाली. आज आपण अध्यक्ष झालो आहोत. मात्र खरे पाहता माझ्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना अध्यक्ष झाल्यासारखे वाटेल."
समाजाचे देणं देण्याच्या भावनेची गरज- "वकील म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती या क्षेत्रात येते, त्यावेळी त्यांनी केवळ पैसे कमावण्याच्या हेतूनं येऊ नये," असे महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलच्या अध्यक्षांनी आवाहन केले. "वकिली व्यवसाय हा केवळ पैसे कमावण्याचा नव्हे तर न्याय मिळवण्यासाठी, सामाजिक कार्य करण्याचा आणि समाजाचे देणे परत करण्याचा व्यवसाय आहे," असे मत देसाई यांनी व्यक्त केले.
वकिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही कल्याणकारी निधी उभारण्याबाबत प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारसोबत त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. नवोदित आणि ज्येष्ठ वकिलांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न पुढे नेणार आहोत- महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष, ॲड संग्राम देसाई
बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम - "तरुण वकिलांना मदत मिळण्यासाठी बार कॉन्सिल चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत राहील. नवोदित वकिलांसाठी आम्ही बार कॉन्सिलच्या माध्यमातून फंड एड स्कीम आणि इतर विविध माध्यमातून मदत करतो. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवख्या वकिलांना प्रॅक्टिस करताना मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम राबवत आहोत. त्यासाठी तरुण वकिलांना मार्गदर्शनासाठी क्रिमिनल आणि सिव्हिल सर्विस मॅन्युअल वितरीत करण्यात येतात. त्यामुळे त्यांना कुठे नोकरी करायची नसेल तरी ते स्वतः योग्य पद्धतीनं वकिली करू शकतात. आम्ही सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील यांचे मार्गदर्शन नवोदित वकिलांना मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो," असे ॲड संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले.