छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Fire Update : शहरातील छावणी परिसरात बुधवारी लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर या आगीबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता आग शॉर्ट सर्किटमुळं लागली होती अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी महावितरणतर्फे देण्यात आलेल्या अहवालानुसार इमारत मालक शेख अस्लम याच्या दुकानात असलेलं विजेचे मीटर थकीत बिलापोटी महावितरणनं 20 मार्च रोजी काढून नेत वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळं त्यांनी घरगुती वापराच्या मीटर मधून दुकानाला वीज घेतली. यात निकृष्ट दर्जाचं वायर वापरल्यामुळं विजेचा लोड अधिक असल्यामुळं शॉर्टसर्किट होऊ शकतं असं या अहवालात म्हटलंय. त्यानुसार छावणी पोलिसांनी दुकान मालक शेख अस्लम याच्यावर सात जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिलीय.
महावितरणतर्फे देण्यात आला अहवाल : छावणी परिसरात लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. यात दिवसभर महावितरणनं आग का लागली असावी? याचा अहवाल तयार केला. त्यानुसार दुकान मालक शेख अस्लम यानं दुकानाचं विज बिल थकवलं होतं. जवळपास 45 हजार 664 रुपयांचं बिल त्यानं थकवल्यानं महावितरणनं 20 मार्च रोजी दुकानाचं व्यावसायिक मीटर काढून नेत वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर दुकान मालकानं निवासी वापरासाठी असलेल्या मीटर मधून दुकानासाठी वीज घेतली. त्यावर सात शिलाई मशीन, इन्वर्टर, दुकानातील लाईट, घरगुती वापर त्यामध्ये कुलर, पंखे, ट्यूबलाईट यांचा समावेश आहे. हे करत असताना त्यांनी दुकानात वीज घेताना निकृष्ट दर्जाची वायर वापरली होती. विजेचा लोड अधिक असल्यानं हे शॉर्टसर्किट झाला असावा असं या अहवालात म्हटलं आहे. रात्री उशिरा महावितरणच्या अभियंतांनी हा अहवाल छावणी पोलिसांना सादर केला त्यानुसार सात जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रमाणे दुकान मालक शेख अस्लम याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
आगीत सात जणांचा मृत्यू : 3 एप्रिलच्या मध्यरात्री छावणी परिसरात दुकानाला आग लागल्यामुळं सात जणांचा मृत्यू झाला होता. इमारतीच्या खाली असलेल्या दुकानात चार सर्किटमुळं आग लागली आणि त्यामुळं निघालेल्या धुरामुळं श्वास गुदमरुन एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आलीय. आगीची वेगवेगळी कारणं यात प्रत्यक्षदर्शींनी सांगितली होती. मध्यरात्री तीनच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचं काही जणांनी सांगितलं, तर दुकानाबाहेर इलेक्ट्रिक गाडी चार्जिंग साठी लावण्यात आली होती. मात्र त्याचं प्लग दुकानाच्या आतून घेण्यात आलं होतं. चार्जिंगला शॉर्ट सर्किट झालं आणि दुकानाला आग लागली अशी देखील माहिती काही स्थानिकांनी दिली. यानुसार तपास सुरु करण्यात असतानाच महावितरणचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
हेही वाचा :