मुंबई Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या आरोपी विकी गुप्तानं त्याच्या सोनू नावाच्या भावाला बिहार येथील चंपारण येथे काही ऑडिओ क्लिप्स मोबाईलवर पाठवल्या होत्या. या ऑडिओ क्लिप्स मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हस्तगत केल्या होत्या. तपासादरम्यान या ऑडिओ क्लिप्स फॉरेन्सिक लॅबला (Forensic Lab) पाठवण्यात आल्या होत्या. आता फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) यांचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं उघडकीस आलं. तसेच आरोपी विकी गुप्ताचा देखील आवाज असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे.
ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी पहाटे ५.५० वाजता दोन शूटर्सनी गोळीबार करून गुजरातमधील कच्छमध्ये पलायन केलं होतं. त्यानंतर १६ एप्रिलला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना बेड्या ठोकल्या होत्या. पनवेल येथील भाड्याच्या घरात हे दोघे आरोपी राहत होते. तेथेच दोन पिस्तुलं दोघांना पुरवण्यात आली. गोळीबार केल्यानंतर दोघांनी पिस्तुलं सुरतच्या तापी नदीत फेकून दिली होती. विशेष म्हणजे व्हीओआयपी आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अनमोल बिष्णोई गॅंगचे साथीदार आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ताच्या संपर्कात होते. दरम्यान, बिहारमधील स्थानिक असलेल्या विकी पालने त्याचा भाऊ सोनू पालला त्याच्या मोबाईलवर काही ऑडिओ क्लिप्स पाठवलेल्या होत्या. त्या दोन ऑडिओ क्लिप्स मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवलेल्या होत्या. त्यापैकी एका ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल आला असून त्या अहवालात ऑडिओमध्ये आरोपी विकी गुप्ताचा आवाज असल्याचं स्पष्ट झालंय. आणखी एका ऑडिओचा फॉरेन्सिक अहवाल येणं बाकी आहे.
या आरोपीनं केली आत्महत्या : या प्रकरणात सागर पाल, विकी गुप्ता, सोनूकुमार बिष्णोई, अनुज थापन हरपाल सिंग उर्फ हॅरी, मोहम्मद रफिक आणि सरदार चौधरी या सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, पोलीस कोठडीत असताना अनुज थापन या आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उरलेले पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अरबाज आणि सलमान खानचा जबाब : या प्रकरणात 4 जून रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान या दोघांचे जबाब नोंदवले होते. यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह चार जणांचे पथक सलमानच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गेले होते. सलमान खानचा साडेतीन ते चार तास तर अरबाज खानचा २ तास जबाब नोंदवण्यात आला. सायंकाळी ५. ३० नंतर गुन्हे शाखेचे पथक सलमानच्या घरून निघाले होते. अरबाज खानचे चार पानांचा जबाब तर सलमान खानचा ९ पानांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सलमाननं अतिशय गंभीर घटना असल्याचं जबाबात स्पष्ट केलंय.
हेही वाचा -
- सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case
- सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी हॅरीनं उतरवली 'पगडी' लढवली 'ही' शक्कल - Salman Khan Firing Case
- सलमान खान गोळीबार प्रकरण : अनमोल बिश्नोई विरोधात लूक ऑऊट नोटीस - Salman Khan Firing Case