नागपूर Salil Deshmukh : केंद्रीय तपास यंत्रणांनी आमच्या घरावर तब्बल १३० धाडी टाकल्या आहेत. ते चौकशीसाठी आले असताना माझ्या सहा वर्षांच्या मुलीचा हात ओढून त्रास देत चौकशी केली गेली. माझी मुलगी लहान होती. आम्हाला त्रास देण्याऱ्या त्या अधिकाऱ्याचं नावं माहीत आहे. तरी अनिल देशमुख झुकले नाहीत. अनेक बाबी योग्य वेळ आली की सांगणार, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख म्हणाले आहेत. ते आज नागपूर येथे बोलत होते.
प्रकरणात विश्वासार्हता नव्हती- देशमुख : ३ वर्षांपूर्वी खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदविलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. न्यायालयानं माझ्या वडिलांना जो जामीन दिला आहे तो मेडिकल ग्राउंडवर नाही तर प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरिटवर दिलेला आहे, असं सलील देशमुख म्हणाले.
पोकळ धमक्यांना घाबरत नाही : अनेक जण आता या विषयावर भाष्य करू लागले आहेत. ते जनतेची दिशाभूल करण्याचं काम करीत आहे. जे लोकं माझ्या वडिलांचा जामीन रद्द करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे, त्यांनी आधी न्यायालयानं जामीन देताना जे निरीक्षण नोंदविलं आहे त्याचा अभ्यास करावा, असं आवाहन सलील देशमुख यांनी केलं आहे. त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही, असं ते म्हणाले आहेत.
ऐकीव माहितीच्या आधारे आरोप : न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदविलं आहे ते महत्त्वाचं आहे. यात प्रामुख्यानं न्यायालयानं म्हटल्यानुसार अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. न्यायालयाने म्हटल्यानुसार अनिल देशमुखांवर ऐकीव माहितीच्या आधारे आरोप करण्यात आले आहे. न्यायालयाने म्हटल्यानुसार सर्व कागदपत्रे आणि बयान ऐकल्यावर असं दिसतं की, भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाही. २ वर्षांपूर्वी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख यांना 'क्लिन चिट' दिली. असं असतानाही भाजपाचे नेते मंडळी अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत. ज्या व्यक्तीनं खोटे आरोप करण्यासाठी नकार देऊन जेलमध्ये जाणं मान्य केलं; पण भाजपाच्या कटकारस्थानाचा भाग बनले नाही, त्यांना तुम्ही जेलमध्ये जाण्याच्या धमक्या देता का? असा प्रश्न सलील देशमुख यांनी विरोधकांना केलाय.
हेही वाचा :
- "...तर आज उद्धव ठाकरे जेलमध्ये असते", अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट - Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
- अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस वादात आता समित कदमांची एन्ट्री, नेमकं काय आहे प्रकरण? - Amit Deshmukh Vs Samit Kadam
- अमृता फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; काय आहे भेटीचं कारण? - Devendra Fadnavis Met PM Modi