मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांची तपासचक्र जलदगतीने फिरताना दिसताहेत. या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची मुंबईतील विविध ठिकाणी 20 पथकं तैनात करण्यात आलीत. तर दुसरीकडे या हल्ला प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. दुसरीकडे सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. कोणताही आता धोका नसल्याची माहिती मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून डॉक्टरांनी दिलीय.
सैफला विश्रांतीची गरज : दरम्यान, आज सकाळी रुग्णालयात अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करीना कपूर दाखल झाली. यानंतर सैफच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर एक मेडिकल बुलेटिन घेण्यात आले. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर गुरुवारी रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रुग्णालयात आला होता. सध्या सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफ चालण्याचाही प्रयत्न करतोय. आज त्याला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये हलवण्यात आलंय. सैफची प्रकृती आता बरी आहे. पण पाठीतील खोल जखमेमुळं त्याला एक आठवडा विश्रांतीची गरज आहे, अशी माहिती सैफ अली खानवर उपचार करणारे डॉ. नितीन डांगे यांनी दिलीय.
कुठलाही धोका नाही : सैफला एकूण मोठ्या चार जखमा झाल्या होत्या. दोन हातावर, एक मानेवर आणि पाठीवर मोठी जखम झाली होती. पाठीच्या मणक्यात दोन इंच ब्लेड घुसले होते. ते ब्लेड आम्ही बाहेर काढले आहे. चाकूचा काही भाग मणक्यात घुसला होता, त्यामुळं त्याच्या मज्जा तंतूपर्यंत इजा पोहोचली होती. पण आता सैफच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही, असंही मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून डॉ. नितीन डांगे यांनी माहिती दिलीय. दुसरीकडे ज्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो लीलावती रुग्णालयातील पोलिसांना आणि करीना कपूरला पाठवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा-