मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. अशातच सणासुदीचे दिवस असल्याने प्रचाराच्या तोफा काहीशा थंडावलेल्या दिसत आहेत. मुंबईत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी घरोघरी जाऊन प्रचार करायला सुरुवात केली असून, सध्या अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातील कोळीवाड्यात जाऊन तिथल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. विशेष म्हणजे या प्रचारात अमित ठाकरे एकटे नसून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मिताली ठाकरेदेखील घरोघरी जाताना दिसत आहेत.
मला आता आमदार होण्याची गरज नाही- अमित ठाकरे: या प्रचार दौऱ्यात माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "माझा रॅली वगैरे काढण्यावर विश्वास नाही. दारोदारी जाऊन प्रचार करणे ही माझी पद्धत आहे. त्यामागे कारणदेखील आहे. माझं निवडणुकीतील व्हिजन काय? मी ही निवडणूक का लढवत आहे? मी कोणती कामं करणार आहे? हे लोकांना कळावं. लोकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी मी लोकांच्या घरोघरी जातोय. आपण कोणाला मतदान करतोय हे लोकांनादेखील कळायला हवं. मला माहीममधील जनतेचादेखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. लोकांना भेटताना लोक काही समस्यादेखील मांडत आहेत. ज्या समस्या तात्काळ सोडवणं शक्य आहे ते आम्ही आता तात्काळ सोडवत आहोत, त्यासाठी आमदार होण्याची गरज नाही," असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात : विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष मुंबईतील दोन जागांवर लागलं असून, यातील एक वरळी विधानसभा तर दुसरी माहीम विधानसभा आहे. दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भावांचा निवडणुकीच्या रिंगणात निभाव लागतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. अशातच अमित ठाकरे थोडादेखील वेळ वाया न घालवता दारोदारी जाऊन लोकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. माहीममध्ये तिहेरी लढत होईल, असं म्हटलं जातंय. यात मुख्य लढत ही विद्यमान आमदार सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी होईल, असा दावा केला जातोय.
सरवणकर यांना विधान परिषदेवर घेणार?: एका बाजूला मतदारसंघात महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपा अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर नाराज असल्याचं बोललं जातंय. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याचं बोललं जातंय. यात मुख्यमंत्र्यांनी आमदार सदा सरवणकर यांना विधान परिषदेत तुम्हाला पुन्हा आमदार केले जाईल, असे आश्वासन दिल्याच्यादेखील चर्चा आहेत.
मी निवडणूक लढवण्यावर ठाम-सरवणकर : मात्र, या सर्व चर्चांचे आमदार सदा सरवणकर यांनी खंडन केले असून, "मी काल वर्षावर गेलो होतो, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाने महायुतीकडून मला एबी फॉर्म दिलाय. महायुतीमध्ये मनसेचा समावेश नाही. मी एकटा पडण्याचा प्रश्न येत नाही. मी निवडणुकीचा प्रचारही सुरू केलाय. मी लोकांच्या आशीर्वादाने निवडूनसुद्धा येणार आहे. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. मला त्यांना नाराज करून चालणार नाही. फडणवीस म्हणाले होते की, आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार," अशी प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिलीय.
हेही वाचा :